Home बातम्या भाऊसाहेब बांदोडकरांनी योग्य वेळी गोव्याला राजकीय स्थैर्य दिले : उपासनी

भाऊसाहेब बांदोडकरांनी योग्य वेळी गोव्याला राजकीय स्थैर्य दिले : उपासनी

0

कै. भाऊसाहेब बांदोडकर यांच्याकडे नेतृत्व कौशल्य होते. त्यामुळे १९६३ ते १९७३ या कालावधीत त्यांनी गोव्याच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्राचा पाया घातला. ते दूरदृष्टीचे नेते होते. म्हणूनच गोव्याला राजकीय स्थैर्याची खरी गरज होती तेव्हा त्यांनी राजकीय स्थैर्य प्राप्त करून दिले. बहुजन समाजासाठी त्यांनी फार मोठे कार्य केले. त्यांनी लोकांच्या गरजा जाणून त्याप्रमाणे पाऊल टाकल्याने ते लोकांच्या आदरास आणि प्रेमास पात्र ठरले. त्यांचे सगळ्यात मोठे योगदान म्हणजे त्यांनी गोव्यात चांगले नेते निर्माण केले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य उद्योग पुनर्निर्माण मंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव शरद उपासनी यांनी येथे केले.

गोव्याचे भाग्यविधाते कै. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने काल श्री. उपासनी यांचे गोवा शासनाच्या कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे संस्कृती भवनमधील बहुद्देशीय सभागृहात ‘भाऊसाहेब बांदोडकर : व्यक्तिमत्त्व व कार्य’ या विषयावर व्याख्यान झाले, त्यावेळी ते बोलत होते. श्री. उपासनी म्हणाले, गोव्याचे महाराष्ट्रात विलीनिकरण करण्याचा भाऊंचा विचार होता. १९६७ मध्ये त्यावर ‘ओपिनियन पोल’ झाले व जनतेने गोवा स्वतंत्र राहू देत असा कौल दिला, मात्र भाऊंनी तो आदराने स्वीकारला. पैशांचा उपयोग चांगल्या कामासाठी होतो तेव्हा त्या पैशांची खरी किंमत होते हे आपण भाऊंकडून शिकलो. (भाऊंचे सचिव म्हणून काम करतांना) सर्वांना मदत करण्याची त्यांची वृत्ती व दातृत्त्व यामुळे मदतीसाठी आलेला कोणीही विन्मुख होवून गेला असे कधी झाले नाही. श्री. उपासनी यांनी सांगितले की, स्वत: गरिबीतून वर आल्याने सर्वसामान्यांच्या अडचणी ते समजू शकत. खेळावर त्यांचे प्रेम होते. विशेषत: क्रिकेट त्यांना खूप आवडे. त्यांनी काम आणि खेळ या दोन्हींचा ताळमेळ साधला होता. गोव्यात उद्योगांची निर्मिती करतांना स्थानिकांना त्यात प्राधान्य मिळायला हवे याकडे त्यांचा कल होता. भाऊंच्या स्वप्नातील गोवा साकारण्याच्या दृष्टीनेच गोव्याचा विकास होईल याची जाणीव उपासनी यानी जाता जाता दिली. व्यासपीठावर भाऊंच्या कन्या तथा माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर, कला आणि संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर, वाहतूक मंत्री सुदीन ढवळीकर, कला संस्कृती संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर व उपसंचालक अशोक परब उपस्थित होत.े सिध्दी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले.