>> दिगंबर कामत यांची टीका
मोदी सरकारचे अंदाजपत्रक हे भांडवलशहांसाठीचे अंदाजपत्रक असून ते लोकविरोधी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला आहे. केंद्रीय अंदाजपत्रकात सर्वसामान्य जनतेसाठी काहीही नसल्याचे कामत म्हणाले. हे अंदाजपत्रक मांडताना सरकारने दुर्बल घटकांचा विचारच केला नसल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारने गोव्याला जे ३०० कोटी रु. दिले आहेत, त्यांपैकी १०० कोटी रु. हे राज्यातील दुर्बल घटकांच्या उन्नतीवर खर्च केले जावेत, अशी मागणीही कामत यांनी केली आहे. मोटरसायकल पायलट, रिक्षाचालक, खाजेकार, पिकअप, टॅम्पोचालक, काकणकर आदींना आर्थिक मदत देण्यात यावी असे कामत यांनी म्हटले आहे. युवकांसाठी रोजगार निर्मिती करण्यावर अंदाजपत्रकात भर देण्यात आला नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
लघू उद्योगांकडे
दुर्लक्ष : विजय
अर्थसंकल्पात गोव्यातील छोट्या उद्योगांसाठी तसेच पारंपरिक उद्योगांसाठी काहीही नसल्याचे गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. खाण उद्योग व पर्यटन उद्योग बंद पडलेला असून त्या लोकांचा विचार व्हायला हवा होता, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.