Home बातम्या भरती प्रक्रिया रोखल्याने फटका बसलेल्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

भरती प्रक्रिया रोखल्याने फटका बसलेल्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

0

मात्र, भरतीसाठीची ही एकूण प्रक्रियाच योग्य प्रकारे झाली नसल्याने संपूर्ण प्रक्रियाच पुन्हा हाती घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या उमेदवारांनी आज ३० रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे धरून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

कॉंग्रेस सरकारने खाण खाते, आरोग्य खाते आदी खात्यांत पदे भरण्यासाठीची प्रक्रिया निवडणुकीपूर्वी पूर्ण केली होती. मात्र, नंतर आचारसंहिता लागू झाल्याने ही पदे भरणे दिगंबर कामत सरकारला शक्य झाले नव्हते. मात्र, काही जणांना नियुक्तीपत्रे सरकारने दिली होती. पण ती आचारसंहितेचा भंग करून देण्यात आल्याचा दावा करून त्यांना नोकर्‍यात सामावून घेण्यास नकार दिला होता.

आरोग्य खात्यात पेशन्ट ऍटेंडंट, बूल ऍटेंडंट, आया अशा पदांसाठीची तर खाण खात्यात फिल्ड सुपरवायझर पदांसाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. मात्र, यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा उपस्थित करून पर्रीकर सरकारने पदे भरण्यास वेळोवेळी नकार दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज पुन्हा हे उमेदवार मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी धडकले असता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले.

वरील पदांसाठी आम्ही पुन्हा अर्ज मागवणार असून तेव्हा तुम्ही अर्ज करा. योग्यतेनुसार नोकर्‍या देऊ असे मनोहर पर्रीकर यांनी त्यांना सांगितले. मात्र, त्याने समाधान न झाल्याने या उमेदवारानी आज ३० रोजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर धरणे धरण्याचा निर्णय घेतला आहे.

१६८ पैकी ११७ नोकर्‍या सत्तरीत!

निवडणुकीपूर्वी सरकारी खात्यातील पदे भरण्यासाठी कॉंग्रेस सरकारने ज्या १६८ उमेदवारांची निवड केली होती त्यापैकी ११७ उमेदवार हे सत्तरी तालुक्यातील असल्याचे आढळून आले असल्याचे आमदार विष्णू सूर्या वाघ यांनी पत्रकारानी नोकर भरतीसंबंधी जो घोळ निर्माण झालेला आहे. त्यासंबंधी विचारलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना सांगितले.

सरकारी नोकर्‍या या उमेदवारांना योग्यतेनुसार मिळायला हव्यात. एकाच तालुक्यातील उमेदवारांची अशा प्रकारे खोगीरभरती केल्यास अन्य तालुक्यातील युवकांनी काय करायचे असा प्रश्‍न त्यानी उपस्थित केला. नोकरभरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येईल व ती पारदर्शक तर असेलच शिवाय सर्वांना योग्यतेनुसार नोकरी मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.