भगवद्गीतेवरील चिकित्सक समीक्षा

0
113
  • – कालिदास बा. मराठे

कित्येक दशकांपूर्वी नव्हे तर सहस्र वर्षांपूर्वी बनवलेली तत्त्वज्ञाने आणि घातलेली बंधने शाश्‍वत काळ टिकून राहाणे सर्वथा अशक्य आहे. आचारकांडात फरक पडत जातात, म्हणून तर पुढच्या काळात नव्या नव्या स्मृती निर्माण होतात. विचारकांडातही असेच आहे.

गतवर्षीच्या कोरोना काळात फार पूर्वी विकत घेतलेले ग्रंथ- ‘श्रीमद्भगवद्गीतारहस्य’, ‘ज्ञानेश्‍वरी’, ‘गीताप्रवचने’ यांचे वाचन केले. त्याच सुमारास डोंबिवलीचे साहित्यअभ्यासक श्री. रविप्रकाश कुलकर्णी यांनी ‘वेदान्त श्रीः’ हा २०१८ चा दिवाळी अंक पाठवला. या अंकाचा मुख्य विषय होता- ‘श्रीमद्भगवद्गीतेतील विविधांगी आकलन.’ विविध तज्ज्ञांनी गीतेवर ४८ लेख लिहिले होते.
त्यांतील संस्कृत पंडित श्री. गणेश थिटे यांनी ‘भगवद्गीतेचे भाष्यकार’ या लेखात लोकमान्य टिळक, श्रीज्ञानेश्‍वर, आचार्य विनोबा भावे, अरविंद घोष यांच्याबरोबर श्रेष्ठ निबंधकार श्री. म. माटे यांचा उल्लेख केला आहे. याच मासिकातील आणखी एक लेखक डॉ. सुभाषचंद्र जैन यांनी म्हटले आहे की, आपल्या मराठी भाषेत ‘गीता’ या ग्रंथावर जितके ग्रंथ आहेत तितके दुसर्‍या कोणत्याही भाषेत नाहीत. त्यांचे हे विधान वाचल्यावर मी तशी यादी करण्याचा प्रयत्न केला. ती यादी परिशिष्टामध्ये देत आहे.
डॉ. थिटे यांनी श्री. म. मोटे यांच्या ‘गीतातत्त्वविमर्श’ या ग्रंथाबद्दल म्हटले आहे की, हा ग्रंथ गीतेविषयीच्या अनेक मौलिक विचारांचा संग्रह आहे. माझ्या मते, गीतेच्या भाष्यकारांच्या यादीत श्री. म. माटे यांचे स्थान फार मोठे आहे.

डॉ. थिटे यांच्याकडे मी संपर्क साधला. हा मूळ ग्रंथ सन १९५७ मध्ये प्रसिद्ध झालाय आणि तो सध्या विकत मिळत नाही. भांडारकर प्राच्य संशोधन मंडळाच्या ग्रंथालयात तुम्हाला तो मिळेल, असे त्यांनी सांगितले. योगायोगाने निवडक श्री. म. माटे खंड १ व खंड २ आमच्या येथील फोंडा सरकारी तालुका ग्रंथालयात वाचायला मिळाले. खंड दोनमध्ये ‘गीतातत्त्वविमर्श’ या ग्रंथातील सहा निबंध देण्यात आले आहेत. दोन्ही खंडांत त्यांच्या ३६ पुस्तकांचा परिचय करून देण्यात आला आहे. हे दोन्ही खंड देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स पुणे यांनी २००७ मध्ये माटे सरांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीनिमित्त प्रकाशित केले आहेत, ज्यांचे संपादन श्री. विनय हर्डीकर व डॉ. म. श्री. माटे यांनी केले आहे.

नुकताच श्री. शरद काळे यांचा ‘श्रीपाद म. माटे व त्यांचा गीतातत्त्वविमर्श’ हा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखांतून या पुस्तकात वेळोवेळी गीतेवर लिहिलेले २० निबंध ३१५ पृष्ठांत आहेत हे कळले. त्यांनी सुमारे १० निबंधांचा सारांश या लेखात दिला आहे. श्री. काळे यांच्या मते हे पुस्तक म्हणजे गीतेवरील भाष्य किंवा टीका नसून एक चिकित्सक समीक्षा आहे.
हे त्यांचे म्हणणे ‘निवडक श्री. म. माटे’मधील खंड २ मध्ये १५७ ते २०० पृष्ठांत सहा प्रकरणे व त्यांची शीर्षके वाचून मान्य करायला हवे.

प्रकरण- १ ः मानुषी संपत्तीला स्थान हवे, प्रकरण- २ ः मूळची गीता निराळी असली पाहिजे, प्रकरण- ३ ः प्रपंच दुःखमय आहे काय?, प्रकरण- ४ ः गीता लोकप्रिय का?, प्रकरण- ५ ः नरक नव्हे कर्तव्य, प्रकरण- ६ ः ही भगवद्गीता अपुरी आहे.

डॉ. थिटे व श्री. काळे म्हणतात त्याप्रमाणे माटे सरांचा हा ग्रंथ अतिशय आगळावेगळा आहे. सहा प्रकरणे वाचून मला हे पटले. खुद्द श्री. म. माटे यांनी या ग्रंथाच्या प्रास्थाविकात म्हटले आहे- ‘हा ग्रंथ वाचून वाचकांच्या मनात संमिश्र भावना उत्पन्न होणे अगदी स्वाभाविक आहे. मात्र जे केवळ श्रद्धाळू आहेत, ठराविकच्या बाहेर जाण्याची ज्यांना कसलीही आवश्यकता भासत नाही त्यांना माझी अनेक विधाने केवळ पाखंडरूप वाटतील. पण आपल्या ध्यानात यावयास हवे की, कित्येक दशकांपूर्वी नव्हे तर सहस्र वर्षांपूर्वी बनवलेली तत्त्वज्ञाने आणि घातलेली बंधने शाश्‍वत काळ टिकून राहाणे सर्वथा अशक्य आहे. आचारकांडात फरक पडत जातात, म्हणून तर पुढच्या काळात नव्या नव्या स्मृती निर्माण होतात. विचारकांडातही असेच आहे.

श्री. म. माटे यांनी आयुष्यभर अस्पृष्टांचा प्रश्‍न समजून घेऊन तो सोडविण्याचा प्रयत्न म्हणून अस्पृष्टांच्या अंगच्या गुणांचा विकास करण्यासाठी प्रत्यक्ष काम करीत होते.

यादृष्टीने त्यांनी आपल्या ग्रंथात मूळची गीता वेगळी असली पाहिजे, दैवी व आसुरी संपत्तीबरोबरच मानुषी संपत्तीची आख्या हवी होती, गीता अपुरी आहे. युद्धोत्तर समाजाचे कोणतेही प्रारूप श्रीकृष्णाने मांडले नाही यासारखे अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत.
आपला पक्ष न्यायाचा आहे, तुझे हक्काचे राज्य मिळवण्यासाठी आणि तुझ्या बायकोच्या बेअब्रूचा सूड घेण्यासाठी तुला लढलेच पाहिजे असे रोखठोक मानवी आवाहन न करता श्रीकृष्णाने वेदांताच्या इतर तत्त्वज्ञानाच्या चर्चेच्या आडरानात अर्जुनाला नेले असे माटे म्हणतात.

गीतेत मानुषी संपत्तीची लक्षणे मिळत नाहीत. रजोगुणांचे विवेचन मिळत नाही. पांडव-कौरवांचे युद्ध सुरू होईपर्यंत श्रीकृष्णाचे प्रत्येक कृत्य व भाषण अत्यंत चतूर, निष्णात, आग्रही आणि बलिष्ठ मुत्सद्याला शोभण्यासारखे होते. इतकेच नव्हे तर मुख्य म्हणजे संस्कृती, विचारांनी अंकित झालेल्या मानवी भावनांना साजेसे होते. ही आपली स्वाभाविक व नेहमीची तर्‍हा श्रीकृष्णाने या युद्धप्रसंगी सोडून दिली असे दिसते.

खरे तर त्याने अर्जुनाला सांगावयास हवे होते- ‘घरात झालेल्या सार्‍या चर्चा तुला आठवतात ना? समेट होतो का पाहावे, न झाला तर लढावे हे ठरलेले होते. लढाई स्वकीयांशी आहे आणि लढाईत ते मरण्याचा संभव आहे. हे काही तुला नवे नाही. पण असे असूनही तुला लढावयाचे नसले तरी तुला दुसरी आठवण आहे ना? द्रौपदीच्या अपमानाचे काय रे झाले? पती म्हणून सूड उगवायचा तो तू हातपाय गाळतोस? युद्ध हे केवळ राज्यासाठी आहे हे तुला कोणी सांगितले? केवळ राज्यासाठी हत्या कदाचित पापाची असेल, पण स्त्रीच्या अब्रूसाठी हत्या पापाची कशी होते? हे युद्ध द्रौपदीच्या अपमानाच्या सूडासाठी आहे.’ श्रीकृष्णाने त्याला कुंतीच्या निरोपाची आठवण- ‘द्रौपदी सांगेल त्या मार्गाने जा. युद्ध द्रौपदीच्या अब्रूसाठी केलेच पाहिजे’- करून द्यायला हवी होती. कारण स्वतः श्रीकृष्ण स्त्रियांचा बंधविमोचक होता. नरकासुराच्या कैदेतून त्याने कुमारिकांना मुक्त केले होते.

त्यामुळे माटे सर म्हणतात, ‘आपद्ग्रस्त स्त्रियांसंबंधी आपली कर्तव्ये कोणती आहेत याचे अत्यंत त्वेषयुक्त, जालीम आणि समाजाला अंती उपकारक असे विवेचन कृष्णाने केले असले पाहिजे. पण वाङ्‌मयव्यासांना त्याचे महत्त्व उरले नाही.’
श्री. माटे पुढे म्हणतात ः ‘कृष्णाने त्याप्रसंगी जी स्त्रीसंरक्षणाची जालीम गीता सांगितली असेल ती जर वाङ्‌मयात राहती आणि तिचे पाठ आणि तिची विवेचने जर घरोघर होत राहती तर भरतखंडातील आम्हा हिंदूंचा इतिहास खचित बदलला असता. आपली अवतार परंपरा कशासाठी आहे याचे विस्मरण आम्हाला बाधक ठरले आहे.’

परशुराम, श्रीराम यांची परंपरा श्रीकृष्णाने स्त्रीबंध विमोचनार्थ पुढे चालवली. तेच काम त्याने याही युद्धाच्या प्रसंगी केले असले पाहिजे. पण गीतेत त्याचा मागमूसही दिसत नाही. तो नसावा हे अस्वाभाविक आणि पूर्वानुसंधानाला असंगत आहे. मूळची गीता निराळी असली पाहिजे. यासंबंधीचे वरचे विवेचन मांडल्यानंतर माटे सरांनी गीता अपुरी आहे हा महत्त्वाचा प्रश्‍न उपस्थित केला आहे. याचे कारण अर्जुनाने जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा- कुलक्षयाने प्राप्त होणारा सामाजिक नरकवास होईल. लक्षावधी नातलगांना आणि सैनिकांना मरण आले म्हणजे समाजात पुरुषवर्ग कमी होईल. तरुण स्त्रिया विधवा होतील. कुलधर्माचे स्मरण कोणाला उरणार नाही. पितरांचे विस्मरण होईल म्हणजेच त्यांचे पतन होईल. इतिहास विसरून जाईल. ज्ञातिधर्म अथवा वर्णधर्म म्हणजे परंपरेने चालत आलेली कर्तव्ये कोणाची याची दाद समाजात राहणार नाही. सामाजिक कर्तव्यांचा गोंधळ माजेल आणि त्या गोंधळलेल्या समाजाला नरकवास म्हणजे कायमचा अधःपात प्राप्त होईल.
अर्जुनाने दोन भये व्यक्त केली होती. राज्य मिळाले तर बंधुवधाचे पातक लागेल आणि कुलक्षयाने सामाजिक नरकवास प्राप्त होईल. त्यापैकी पहिल्या भयाचेच श्रीकृष्णाने निराकारण केले. परंतु त्याच्या दुसर्‍या भयाचे निराकरण केलेले दिसत नाही. खरे तर अर्जुनाचे दुसरे भय किती खरे होते हे युद्धानंतरच्या परिणामांवरून सिद्ध झाले आहे, ज्याची वर्णने महाभारतात दिलेली आहेत.
अर्जुनाने व्यक्त केलेली समाजनाशाची भीती ही आत्मिक भीतीपेक्षा जास्त महत्त्वाची होती. त्यासंबंधी श्रीकृष्णाने विवेचन करायला हवे होते. त्यामुळेच गीता अपुरी आहे असे म्हणावेसे वाटते.

माटे सरांनी यासंबंधी जे सविस्तर विवेचन केले आहे ते मुळातूनच वाचायला हवे आणि त्यासाठी मूळ ग्रंथाची नवी आवृत्ती प्रकाशित करायला हवी. निवडक श्री. म. माटे खंड दोनमधील सहा प्रकरणे वाचून दुधाची तहान ताकावर भागते. मी वाचकांना आवाहन करतो की त्यांनी हे मूळ पुस्तक परत प्रकाशित केले जावे यासाठी हा ग्रंथ विकत घेण्याची तयारी दर्शवावी.
ता.क. ः भगवद्गीतेत अठरा अध्याय असून ज्यामध्ये ७०० श्‍लोक आहेत. ज्ञानेश्‍वरांनी जी टीका लिहिली त्यामध्ये ९०३४ ओव्या आहेत. परंतु म्हार्दोळ येथील ‘कृतार्थ’ संस्थेने नुकतीच अठरा श्‍लोकांमध्ये अठरा अध्यायांची मराठी गीतासार पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. या पुस्तिकेचा कर्ता अज्ञात आहे. यातील पहिला व शेवटचा श्‍लोक देऊन या लेखाला पूर्णविराम देतो.

श्‍लोक- १
संजय उवाच
गेले कौरव आणि पांडव रणीं, वर्णी कथा संजय| ती ऐके धृतराष्ट्र उत्सुक मने| वाटे तया विस्मय| पाहे पार्थ रणीं कुलक्षय घडे| चित्तीं विषारा धरी| युद्धापासुनि होऊनी विमुख तैं टाकी धनुष्या दुरी॥
शेवटचा १८ वा श्‍लोक
त्यजूं पाहसी युद्ध परी ते प्रकृती करविल तुजकडुनी|
तरि वद पार्था, परिसुनि गीता रूचते ममता का अजुनी|
मग तो वरला-मोह निरसला, संशय नुरला खरोखरी|
कृतार्थ झालों, प्रसाद हा तव, तव वचन तुझें मज मान्य हरी ॥

परिशिष्ट- १
१. श्रीज्ञानेश्‍वरी- संत ज्ञानेश्‍वर, २. यथार्थ दीपिका- वामन पंडित, ३. गीतार्णव- संत दासोपंत, ४. मंत्रगीता- संत तुकाराम, ५. गीतारहस्य- लोकमान्य टिळक, ६. गीता हृदय- सानेगुरुजी, ७. गीताप्रवचने- आचार्य विनोबा भावे, ८. गीताई- आचार्य विनोदा भावे, ९. गीता एक टीका- निवृत्तीनाथ, १०. सुबोध गीता सार- गीता फाऊंडेशन मिरज, ११. गीतायज्ञ- गीता फाऊंडेशन मिरज, १२. गीतार्थ- अप्पाराव कुलकर्णी, १३. गीतातत्त्वविमर्श- श्री. म. माटे, १४. श्री गीतायोग ः शोध ब्रह्मविद्येचा- डॉ. बालाजी तांबे, १५. पूर्णवाद- डॉ. रामचंद्र पारनेरकर महाराज, १६. गीतेचा जगप्रवास- वा. ल. मंजुळ, १७. श्रीमद्भगवद्गीता- डॉ. आशा देशपांडे, १८. श्रीमद्भगवद्गीता- श्री. शरद काळे, १९. श्रीरामसीता- गोविंद सरदेसाई, २०. पांडुरंग गीता- पां. रा. देशपांडे, २१. मराठी देवगीता- पां. ह. कुलकर्णी, २२. अष्टावक्रगीता- पां. ह. कुलकर्णी, २३. श्री ज्ञानेश्‍वरी सुलभ निरुपण- बाळासाहेब थापकर, २४. गीता साक्षात्कारदर्शन- डॉ. रा. द. रानडे, २५. गीता रत्नमाला- आत्माराम वझे, २६. विविध गीता प्रकल्प (खंड १ ते ३)- प्रा. शैलजा काळे व सहकारी, २७. गीतामृतम- पांडुरंगशास्त्री आठवले, २८. श्री गीता भाष्यार्थप्रकाश- द. वा. जोग, २९. गीतार्थ दर्शन- कृष्ण अर्जुनवाडकर, ३०. नवपार्थहृदगत- राजीव साने, ३१. श्रीमद्भगवद्गीतेची प्रस्थानत्रयी- डॉ. अविनाश चाफेकर, ३२. मराठी श्‍लोकबद्ध सार- अज्ञात.

मराठी अनुवाद
१. भगवद्गीता जशी आहे तशी- श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाय (इंग्रजी), २. गीतासार- श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाय (इंग्रजी), ३. लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचे आधुनिक विवेचन- अरुण तिवारी, ४. भगवद्गीता ः गांधीजींच्या चिंतनातून- महात्मा गांधी (भगवान दातार).