भंडारी ज्ञातीचे उमेदवार मोठ्या संख्येने देणार्‍या पक्षास समाजाचा पाठिंबा

0
34

>> अशोक नाईक यांची पत्रकार परिषदेत माहिती

येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत जो राष्ट्रीय पक्ष भंडारी ज्ञातीतील लोकांना सर्वांत जास्त उमेदवारी देईल त्या पक्षाच्या मागे भंडारी समाज ठामपणे उभा राहील, असे काल भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

गोव्यात जी लोकसंख्या आहे त्यापैकी ६०% लोक हे भंडारी समाजातील आहेत. मात्र, असे असताना भंडारी ज्ञातीतील लोकांना निवडणुकीच्यावेळी आवश्यक तेवढे प्रतिनिधीत्व मिळत नसल्याचे नाईक म्हणाले. गोव्याच्या राजकीय इतिहासात भंडारी समाजाला एकदाच विधानसभा निवडणुकीत आवश्यक तेवढे प्रतिनिधीत्व मिळाले होते, असे सांगून त्यावेळी मनोहर पर्रीकर हे राज्याचे मुख्यमंत्री होते, अशी माहिती नाईक यांनी दिली. त्यावेळी भंडारी समाजातील १२ जणांना उमेदवारी देण्यात आली होती, असे ते म्हणाले. मात्र, हे एक उदाहरण सोडल्यास आतापर्यंत भंडारी समाजावर राष्ट्रीय पक्षांनी अन्यायच केला असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.

भंडारी समाजाने बाराही तालुक्यात आपल्या समित्यांची स्थापना केली असून येत्या निवडणुकीत एकसंघ राहण्याचा निर्णय घेतला आहे. जो पक्ष आपल्या ज्ञातीतील लोकांना जास्तीत जास्त उमेदवारी देईल त्या पक्षाच्या पाठीमागे भंडारी समाज ठामपणे उभे राहील असे त्यांनी स्पष्ट केले.