राज्यात दुसर्‍या लाटेनंतर शुक्रवारी सर्वांत कमी रुग्ण

0
27

>> चोवीस तासांत १५ कोरोनाबाधितांची नोंद

कोरोनाचा संसर्ग झालेल्या नव्या रुग्णांचे प्रमाण आता खूपच कमी होऊ लागलेले असून ही दिलासादायक अशी बाब असल्याचे काल आरोग्य खात्यातील सूत्रांनी स्पष्ट केले. गेल्या २४ तासांत कोरोनाचा संसर्ग झालेले केवळ १५ नवे रुग्ण आढळून आले असून कोविडच्या दुसर्‍या लाटेनंतर आतापर्यंत २४ तासांत सापडलेल्या रुग्णांची ही सर्वांत कमी संख्या आहे. कोविड होण्याची टक्केवारी काल ०.८७ एवढी होती. आतापर्यंतची ही सर्वांत कमी टक्केवारी आहे. गेल्या २४ तासांत एकाही कोविड रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, ही सुद्धा आणखी एक दिलासादायक अशी घटना असल्याचे आरोग्य खात्यातील सूत्रांनी पुढे म्हटले आहे.

गेल्या २४ तासांत १७०५ जणांची कोविडसाठी चाचणी करण्यात आली असून त्यापैकी अवघ्या १५ जणांना कोविडची लागण झाली असल्याचे आढळून आले. गेल्या २४ तासांत ३६ जण रोगमुक्त झालेले असून त्यामुळे राज्यात सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ही ३१६ एवढी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७.९३ टक्के एवढे आहे. गेल्या २४ तासांत इस्पितळातून एका रुग्णाला कोरोनामुक्त झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला. तर आणखी ३ रुग्णांना कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे इस्पितळात दाखल करण्यात आले.

एकूण मृत्यू ३३६६
दरम्यान, कोविडमुळे आतापर्यंत राज्यात ३३६६ जणांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात सध्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १,७४,५७८ एवढी झाली आहे. तर एकूण कोरोना रुग्णसंख्या १,७८,२६० एवढी झाली आहे. राज्यात आतापर्यंत १४,७९,७२८ एवढ्या स्वॅब चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत घरी विलगीकरणात राहिलेल्यांची संख्या १,२४,९३८ एवढी असून इस्पितळात आतापर्यंत भरती झालेल्यांची संख्या २९,७९९ एवढी आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.