येती गोवा विधानसभा निवडणूक आपतर्फे लढवणार ः पुती गावकर

0
51

येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवारीवर लढणार असल्याचे काल कामगार नेते पुती गावकर यांनी जाहीर केले. गेल्या २४ ऑक्टोबर रोजी आपण नवी दिल्लीला जाऊन आम आदमी पक्षाचे प्रमुख व नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या दिल्ली मॉडेलने आपण प्रभावित झाल्याचे सांगून गोव्याच्या विकासासाठी आपण आम आदमी पक्षात प्रवेश करून त्या पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे गावकर यांनी काल स्पष्ट केले.

आपणाला विशेष करून आम आदमी पक्षाने शिक्षण व आरोग्य क्षेत्रात केलेले काम खूपच आवडले असल्याचे सांगताना नवी दिल्लीत जसे रस्ते आहेत तसे कुठेच नसल्याचेही त्यांनी नमूद केले. २०१२ सालापासून गोव्याचा विकास खुंटला असून बेरोजगारीचे प्रमाण हे तब्बल २९.६ टक्क्यांवर पोचले असल्याचे प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले असल्याचे ते म्हणाले.
गेल्या २० वर्षांत गोव्याची खूपच प्रगती व्हायला हवी होती, मात्र काही लोकांनी खाण उद्योग बंद पडल्यानंतर लोकांना झुलवत ठेवून फसवले. परिणामी खाण उद्योगावर अवलंबून असलेले लाखो लोक बेरोजगार बनले. सरकारी खात्यात पदे भरली न गेल्याने बेरोजगारी वाढतच जाऊन २९.६ टक्क्यांवर पोचली. त्यामुळे दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत गोवा देशात सर्वांत वरच्या स्थानी होता तो आता तेथे राहिला नसल्याचे गावकर म्हणाले.

उद्या आपमध्ये प्रवेश
गोवा राज्य नवनिर्माण आघाडीचे प्रमुख तथा खाण अवलंबितांच्या आंदोलनाचे नेते असलेले पुती गावकर हे उद्या ७ नोव्हेंबर रोजी आम आदमी पक्षात प्रवेश करणार आहेत. खाण उद्योग पूर्ववत सुरू करणे व जमीन मालकीचा विषय निकालात काढणे ह्या दोन मुद्यांवर आपण आम आदमी पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.