ब्रिटनहून आलेल्यांतील ३७ जण कोरोनाबाधित

0
228

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती

>> नियमांचे पालन करून नववर्ष साजरे करण्याचे आवाहन

राज्यात ब्रिटनमधून एकूण ९०० प्रवासी गोव्यात दाखल झाले आहेत. त्यातील ३७ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या प्रवाशांच्या संपर्कात आलेले २३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोविड पॉझिटिव्ह ४३ प्रवाशांच्या स्वॅबचे नमुने पुढील तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यातील दोन प्रवाशांचे अहवाल प्राप्त झाले असून दोन्ही अहवाल निगेटिव्ह आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
नवीन कोरोना स्ट्रेनच्या पार्श्‍वभूमीवर नववर्षाचा आनंदोत्सव साजरा करताना पर्यटक आणि नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करून कोरोना पसरू नये म्हणून खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

कोरोनाने राज्यात दोघांचा मृत्यू
दरम्यान, राज्यात चोवीस तासांत नवीन ९७ कोरोना रुग्ण आढळून आले असून २ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ५० हजार ९८१ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ९३१ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ७३७ एवढी झाली आहे. गोमेकॉमध्ये दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. फोंडा येथील ७२ वर्षीय पुरुष रुग्ण आणि काणकोण येथील ८५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील आणखीन ११४ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ३१३ एवढी झाली असून कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७२ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणखी ७० जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन ३७ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.
कोविड प्रयोगशाळेत १९६१ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. मडगाव आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ८७ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ६० रुग्ण, पर्वरी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ५७ रुग्ण, पणजी उच्च आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ७४ रुग्ण आहेत. राज्यातील इतर भागातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या पन्नासपेक्षा कमी आहे.