ब्रिटनवासियांचा ‘ब्रेक्झिट’च्या बाजूने कौल

0
109

अखेर ब्रिटनमधील ५१.९० टक्के नागरिकांनी आपल्या देशाने युरोपियन युनियनमधून (ईयू) बाहेर पडावे (ब्रेक्झिट) असा ऐतिहासिक कौल दिल्याने गेला बराच काळ या विषयावर चाललेल्या चर्चेवर पडदा पडला. जगभरातील दिग्गज नेत्यांकडून या विषयावर उभय बाजूंनी प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या. ब्रेक्झिटच्या बाजूने कौल जात असल्याचे स्पष्ट होऊ लागल्यानंतर जगातील विविध शेअर बाजारांवर परिणाम झाला. जपानमधील शेअर बाजारात ८ टक्के घसरण उडाली. तेथे सर्किट ब्रेकर वापरून बाजाराचे काम १० मिनिटे स्थगित ठेवण्यात आले. जगभरातील देशांबरोबरच भारताच्या अर्थव्यवस्थेवर या घटनेचा परिणाम होणार असल्याने भारतासह सर्व संबंधित देशांनी उपाययोजनांची आखणी सुरू केली आहे.

ब्रिटनने युरोपियन युनियनमध्ये रहावे की बाहेर पडावे यावर गुरुवार दि. २३ रोजी जनमत कौल घेण्यात आला होता. त्याचा निकाल काल सकाळीच जाहीर झाला. ब्रिटन ही जगातील पहिल्या पाच आर्थिक सत्तांपैकी एक आहे. २८ देशांचा सहभाग असलेल्या युरोपियन महासंघातून ब्रिटनने बाहेर पडणे ही बाब संपूर्ण जगाच्याच चर्चेचा विषय ठरली होती. ब्रिटन युरोपियन महासंघातून प्रत्यक्ष बाहेर पडण्याची प्रक्रिया आता सुरू होणार असून ती पूर्ण होण्यास काही अवधी लागणार आहे. दरम्यानच्या काळात या बदलाचे दूरगामी परिणाम जगभरात जाणवण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

‘त्या’ गोमंतकीयांना नागरिक म्हणून भारतात येणे अशक्य

>> व्हिसावर ब्रिटनमध्ये रहावे लागेल : डॉ. मिस्किता

पंतप्रधान कॅमेरून यांची राजीनाम्याची घोषणा
ब्रिटनने युरोपियन युनियनमध्ये रहावे या मताचे असलेल्या ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी नैतिक पराभव स्वीकारून पंतप्रधानपदाचा आपण राजीनामा देणार असल्याची घोषणा काल सकाळी केली. जनमताचा आदर करत ईयूमधून बाहेर पडण्याच्या दिशेने पावले उचलण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कॅमेरून येत्या ऑक्टोबरपर्यंत पंतप्रधान राहतील व नंतर पदत्याग करणार असून त्यानंतर ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा निर्णय होणार आहे.

ईयूमधून बाहेर पडण्यासाठी
१ कोटी ७४ लाख १० हजार
७४२ मतदारांचा कौल
ईयूमध्ये रहावे यासाठी
१ कोटी ६१ लाख ४१ हजार
२४१ जणांनी केले मतदान
स्कॉटलंडचे ईयूमध्ये राहण्यास बहुमत