ब्रिटनला भारताचे चोख प्रत्युत्तर

0
7

>> दिल्लीतील ब्रिटीश दूतावास आणि उच्चायुक्तांच्या निवासस्थानासमोरील सुरक्षा हटविली

>> भारताच्या आक्रमक भूमिकेनंतर लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेरील सुरक्षा वाढवली

ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. त्यानंतर विविध स्तरावरून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. या प्रकरणी भारत सरकारने ब्रिटनकडे दोषींवर कारवाईची मागणी केली होती; मात्र ब्रिटिश सरकारने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे आता भारतानेही ब्रिटिशांना जशास तसे उत्तर देण्यास सुरूवात केली असून, केंद्र सरकारने दिल्लीतील ब्रिटीश दूतावास आणि ब्रिटिश उच्चायुक्तांच्या निवासस्थानासमोरील सुरक्षा हटवण्यात आली आहे. भारताच्या या कृतीनंतर लंडनधील भारतीय दूतावासाजवळ सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

तीन दिवसांपूर्वी पंजाबमधील खलिस्तानवादी स्वयंघोषित शीख धर्मोपदेशक अमृतपाल सिंग विरोधात सुरू असेलल्या कारवाईच्या निषेधार्थ खलिस्तानी समर्थकांनी ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले होते. तसेच यावेळी खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर असलेल्या तिरंग्याचा अवमान केला होता. त्यानंतर भारत सरकारने ब्रिटनच्या भारतातील उच्चायुक्तांना बोलावून तीव्र निषेध व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती; मात्र या प्रकरणातील दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
दोषींवर कारवाई न झाल्याने केंद्र सरकारने जशास तसे प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत ब्रिटीश दूतावास आणि चाणक्यपुरीत ब्रिटीश उच्चायुक्तांचे निवासस्थान आहे. दोन्ही इमारतींसमोर बॅरिकेड्स लावून बंदुकधारी पोलीस सुरक्षा असते, ती काढून घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे याठिकाणी असलेल्या अन्य देशांच्या दूतावासांसमोर सुरक्षारक्षक तैनात आहे.

हे पाऊल भारताच्या कुटनीतीचा भाग
पंजाबमधील खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याच्याविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला करण्यात आला होता. यावेळी खलिस्तानी हल्लेखोरांनी तिरंग्याचा अवमान केला होता. तसेच काही खलिस्तान्यांनी भारतीय उच्चायुक्तालयाची तोडफोडही केली होती. त्यावर ब्रिटीश सुरक्षा यंत्रणेने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे भारताने आता उचलेले हे पाऊल कुटनीतीचा भाग असल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांना चकवण्यासाठी
अमृतपाल सिंगचे सात वेश

गेल्या काही दिवसांपासून देश पातळीवर अमृतपाल सिंग हे नाव चर्चेत आले आहे. ‘वारिस पंजाब दे’ या खलिस्तान समर्थक संघटनेचा म्होरक्या असणारा अमृतपाल सिंग सध्या फरार आहे. पंजाब पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. मात्र, एवढे असूनही अमृतपाल सिंग सापडत नसल्याचे एक कारण त्याच्या पेहरावात दडले आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी अमृतपाल सिंग वेगवेगळे वेश धारण करत असल्याची माहिती पंजाब पोलिसांकडून देण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी नुकतेच अमृतपालचे सात वेगवेगळ्या प्रकारचे लुक शेअर केले आहेत. त्यामध्ये एका फोटोत अमृतपाल पगडीशिवाय स्टायलिश लुकमध्ये दिसतोय.