ब्राझिल अंतिमपूर्व फेरीत

0
81

पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना ब्राझिलने जर्मनीवर २-१ अशी मात करत फिफा अंडर १७ विश्‍वचषक स्पर्धेच्या ‘अंतिम चार’ संघांत स्थान मिळविले. विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर ६६,६१३ फुटबॉलप्रेमींच्या उपस्थितीत खेळताना उभय संघानी या सामन्यात जोरदार खेळ दाखवला.

पहिल्या सत्रात जर्मनीने चेंडूवर अधिकवेळ ताबा राखताना ब्राझिलच्या आघाडीफळीला थोपवून धरण्याचे काम केले. दोन्ही संघांनी सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक धोरण न स्वीकारता ताळमेळ साधण्यासाठी काही मिनिटे घेतली. २१व्या मिनिटाला लुकास हाल्टर याने ब्राझिलच्या बॉक्समध्ये जॉन येबोहा याला अवैधरित्या पाडल्याने रेफ्रींनी जर्मनीला पेनल्टी बहाल केली. या पेनल्टीवर जान फिएटे आर्प याने गोलजाळीचा वेध घेत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत जर्मनीने ही आघाडी टिकवून ठेवली. ब्राझिलपेक्षा जर्मनीने अधिकवेळा हल्ले केले. सामन्याच्या ७०व्या मिनिटापर्यंत सामना जर्मनीच्या बाजूने होता. परंतु, आघाडीवर असल्यामुळे जर्मनीच्या बचावफळीत असलेल्या गाफिलतेचा फायदा घेण्यात ब्राझिलचा संघ यशस्वी ठरला.

७१व्या मिनिटाला दक्षिण अमेरिकन विजेत्या ब्राझिलकडून बदली खेळाडू वेवरसन याने बरोबरीचा गोल केला. यानंतर सहा मिनिटांनी पॉलिनो याने ब्राझिलला आघाडी मिळवून दिली. या पराभवामुळे जर्मनीचा भ्रमनिरास झाला असून पिछाडीवरून विजय मिळविल्याने ब्राझिलचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. गुवाहाटी येथे बुधवारी होणार्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात ब्राझिलचा सामना इंग्लंड संघाशी होणार आहे. आपल्या ‘सांबा’ शैलीमुळे प्रसिद्ध असलेल्या ब्राझिलने जर्मनीचे आव्हान परतवून लावले असले तरी उपांत्य फेरीत इंग्लंडसमोर त्यांचा कस लागणार आहे.