ब्रह्मानंद शंखवाळकर, ब्रह्मेशानंद स्वामींना पद्मश्री

0
60

>> १२८ जणांना पद्म पुरस्कार जाहीर; बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काल केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये १२८ जणांचा समावेश आहे. गोव्यातील दोघांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांना अध्यात्म, तर माजी फुटबॉलपटू ब्रह्मानंद शंखवाळकर यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा पद्मविभूषणसाठी एकूण चार नावांची निवड करण्यात आली आहे, त्यातील तिघांना हा सन्मान मरणोत्तर देण्यात आला आहे. पद्मविभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये माजी सीडीएस जनरल बिपिन रावत (मरणोत्तर), उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह (मरणोत्तर), राधेश्याम खेमका (मरणोत्तर) आणि गायिका प्रभा अत्रे यांच्या नावांचा समावेश आहे.

काल केंद्र सरकारकडून मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. एकूण १२८ जणांना पद्म पुरस्कार जाहीर केले. त्यात चौघांना पद्मविभूषण पुरस्कार, १७ जणांना पद्मभूषण आणि १०७ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
कुंडई येथील श्री दत्त पद्मनाभ पीठाचे पीठाधीश्वर सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री जाहीर केला आहे.

भारतीय फुटबॉल संघाचे माजी गोलरक्षक ब्रह्मानंद शंखवाळकर यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्कार बहाल केला आहे. शंखवाळकर यांनी १९७१ साली पानवेल स्पोर्टस् क्लबसोबत आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. गोव्याच्या फुटबॉल संघाचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले. चांगल्या कामगिरीनंतर ब्रह्मानंद यांची १९७५ साली सर्वप्रथम भारतीय संघात निवड झाली. भारताच्या झांबियातील सदिच्छा दौर्‍यातील कामगिरीमुळे त्यांना त्यांच्या चपळतेमुळे ‘चित्ता’ हे टोपणनाव पडले. १९८३ साली झालेल्या नेहरू कप स्पर्धेत त्यांना भारताचा कप्तान करण्यात आले. १९८६ सालापर्यंत त्यांनी संघाचे नेतृत्व केले. भारतीय संघाकडून त्यांनी पन्नासपेक्षा अधिक सामने खेळले. १९९७ साली त्यांना केंद्र सरकारने फुटबॉलमधील योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने गौरवले होते.

उद्योगपती नटराजन चंद्रशेखरन, तसेच कृष्णा इल्ला व सुचित्रा इल्ला यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी, विक्टर बॅनर्जी व गुरमीत बावा यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. गायिका सुलोचना चव्हाण आणि गायक सोनू निगम यांना कला क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

सायरस पुनावाला, सत्या नडेला,
सुंदर पिचाईंना पद्मभूषण

कोविशील्ड लस बनवणार्‍या सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींनी समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे जे कार्य केले आहे, ते इतरांसाठी आदर्शवत आहे. त्यांना प्रतिष्ठेचा पद्मश्री किताब प्राप्त झाल्याबद्दल तमाम गोमंतकीयांच्या वतीने आपण त्यांचे अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी फुटबॉलपटू म्हणून केलेली कामगिरी अतुलनीय अशी आहे, असे त्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी देखील दोघांचे अभिनंदन केले आहे.