ब्रँड ॲम्बॅसडर

0
7
  • प्रा. रमेश सप्रे

एकूण काय ब्रँड ॲम्बॅसडर म्हणजे फक्त व्यापारी जाहिरात करणारी मॉडेल्स नसतात. त्यांचा स्तर अधिक वरचा असतो. ते लोकहिताचा संदेशही देत असतात. त्यांनी तो द्यावा अशी अपेक्षाही असते.

तिला कल्पनाही नव्हती की पुढच्या क्षणी आपल्या जीवनात काय वाढून ठेवलंय? अर्थातच चांगल्या अर्थानं! भूक लागली असेल म्हणून आईनं पैसे देऊन बेकरीतून पाव आणायला सांगितलं. अतिशय आनंदात ती पाव घेऊन घराकडे यायला निघाली. लवकरच पाव खायला मिळणार या आशेनं ती पळत निघाली. आजूबाजूच्या चिखलाची तिला पर्वा नव्हती. कदाचित जाणीवही नव्हती. इतक्यात समोरून आले एक काका. त्यांना पाहून ती हसली. मनभरून हसली. ते हास्य इतकं निष्पाप, निरागस होतं की काकाला मोह आवरला नाही. त्यानं तिचा तो मनमोकळं हसणारा छान फोटो काढला. फोटोत दिसला तिचा साधासा फ्रॉक, छातीशी धरलेला पाव ज्याच्यावर मोठ्या अक्षरात बेकरीचं नाव लिहिलेलं. या सर्वांवर मात करणारं तिचं ते निखळ बालसुलभ हास्य! अहाहा! तो फोटो काकानं समाजमाध्यमांवर टाकल्यावर लगेच अरण्यात दावानल भडकावा तसा व्हायरल झाला… अनेकांनी उत्स्फूर्तपणे त्या बेकरीच्या चालकांना सुचवले, या छोट्या छोकरीला तुमच्या बेकरीचा ‘ब्रँड ॲम्बॅसडर’ बनवा!

झालं. चक्रं फिरली. बेकरीवाल्यानं तिचं घर शोधलं. घर कसलं खोपटंच असेल ते. पण तिच्या आईला गाठून त्या मायलेकींना नवे कपडे, एक सुंदरसं घर भेट म्हणून दिलं आणि जाहीर केलं- ‘या मुलीचा पदवी शिक्षणापर्यंतचा (ग्रॅज्युएशन) सारा खर्च बेकरीतर्फे केला जाईल!’ हे सारं घडत असताना ती छोटी तशीच हसत पाव खात स्वर्गीय सुख मिळवत असेल. तिच्या नकळत ती ब्रँड ॲम्बॅसडर बनली. ही गोष्ट आहे आफ्रिकेतल्या एका देशातली.
अशी अनेक छोटी मंडळी बनलीयत ब्रँड ॲम्बॅसडर!
ब्रँड ॲम्बॅसडरला मराठी, हिंदीत समर्पक शब्द नाही. नाही म्हणायला गुडवुइल ॲम्बॅसडरला ‘सदिच्छा दूत’ असा अर्थवाही शब्द आहे; पण त्याचा वस्तू, त्यांचं उत्पादन, त्या उत्पादनाची वैशिष्ट्ये, खास उपयोग इ. व्यापारी (खरं तर बाजारी- मार्केटिंग) गोष्टींशी संबंध नाही.

ज्यावेळी जग आजच्यासारखं बाजारू बनलं नव्हतं, स्पर्धाही बऱ्यापैकी निरोगी होती, जाहिरातींवर एवढा भर नव्हता नि खर्चही केला जात नव्हता, त्यावेळी म्हणजे सुमारे साठ वर्षांपूर्वी एक अतिशय म्हणजे अतिशय गोड मुलगी ‘मर्फीबेबी’ म्हणून जगप्रसिद्ध झाली. तिचा तो दिव्यतेशी स्पर्धा करणारा चेहरा आणि डाव्या हाताचं बोट ओठांच्या डाव्या टोकाला टेकवलेली मुद्रा… मर्फी कंपनीला नि तिच्या उत्पादनांना या निरागस मुलीनं खूप वरच्या उंचीवर नेलं. देवदूतांना हेवा वाटावा असा हा ब्रँड ॲम्बॅसडर!

आपल्याकडची साबणाची जाहिरात करणारी एक बेबी अशीच स्फटिकधवल कपडे घालून स्वतःभोवती गिरकी घेत त्या साबण कंपनीच्या उत्पादनांच्या वेष्टनावर जाऊन चिकटायची. आठवतेय?
एका कंपनीच्या बिस्किटांचा छोटा पुडा हातात घेऊन तो उंचावणारी छोटी बालिका. मुलांना एका गोष्टीची गंमत वाटायची, तिच्या हातातील पुड्यावर तिनं तसलाच पुडा हातात घेतल्याचं चित्र. त्या छोट्या चित्रातही त्या मुलीचं तसंच छोटं चित्र असायचं. किती वेळा त्या चित्रात ती मुलगी दिसेल, याचं निश्चित उत्तर कोण सांगू शकेल? पण ही छोटी ब्रँड ॲम्बॅसडर त्या बिस्किट कंपनीला मात्र खूपच शुभशकुनी ठरली.
आणि दर आठवड्याला नव्या रूपात भेटणारी अन्‌‍ नवा संदेश देत अटर्ली बटर्ली… म्हणणारी ती चित्रातली चिमुरडी. कितीतरी वर्षं झाली तिचा प्रभाव वाढतोच आहे.पतसं पाहिलं तर ब्रँड ॲम्बॅसडर स्त्री-पुरुष अनेकानेक आहेत.

आठवा ती एका जगप्रसिद्ध साबणाची जाहिरात. ठराविक कालावधीसाठी त्यावेळची प्रसिद्ध, नवोदित नटी त्यांची ब्रँड ॲम्बॅसडर असते. आणि तसं असणंही त्या कंपनीला जेवढं लाभदायक असतं त्याहीपेक्षा त्या नटीसाठी ती अतिशय प्रतिष्ठेची गोष्ट असते.

सौंदर्यप्रसाधने, कपडे, पादत्राणे अशा अनेक नित्योपयोगी वस्तूंचे विविध ब्रँड्स नि त्यांचे अनेक अँम्बॅसडर. यात स्त्री-पुरुष तर असतातच, याच्या जोडीला चित्रपटसृष्टी, क्रीडाक्षेत्र अशा अनेक क्षेत्रांतील नामवंतांना ब्रँड ॲम्बॅसडर बनवलं जातं.

खरं तर नुसता ॲम्बॅसडर हा राजदूत असतो. प्रत्येक देशाचे प्रत्येक महत्त्वाच्या देशात असे राजदूत असतात. ते परदेशात आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत असतात. इंग्रजीत एक छान वाक्य आहे- ‘ॲन्‌‍ ॲम्बॅसडर इज अ पर्सन हू लाइज ॲब्रॉड फॉर द सेक ऑफ हिज कंट्री.’ म्हणजे, राजदूत ही व्यक्ती देशाची प्रतिनिधी म्हणून- परदेशात राहते (लाइज ॲब्रॉड) आणि दुसरा अर्थ, आपल्या देशासाठी ती खोटंही बोलते (लाइज्‌‍). असे अनेक राजदूत ऐतिहासिक व्यक्ती बनले आहेत.

पण आपण बोलतोय ब्रँड ॲम्बॅसडरबद्दल. ‘सदिच्छा राजदूत’ म्हणून अनेक अभिनेते, क्रीडापटू आपली सेवा राष्ट्रकार्यासाठी देतात. ‘अमूल्य भारत’ ही अशी जाहिरात होती, पण या ब्रँड ॲम्बॅसडरनी आपली सामाजिक प्रतिमा स्वच्छ ठेवायची असते. एकूणच जीवनशैली आपल्या ब्रँडला साजेल अशीच ठेवावी लागते.
एखाद्या राज्याचासुद्धा ब्रँड ॲम्बॅसडर असतो. तो सदिच्छा दूत असतो. आपल्या चालण्या-बोलण्यात त्या राज्याच्या माहात्म्याचं भान राखावं लागतं.

काहीशा खेदानं म्हणावं लागतं की या सदिच्छा दूतांना आपली प्रतिमा सदिच्छा दूत म्हणून दिल्या जाणाऱ्या संदेशाशी समांतर, पूरक अशी राखता आली नाही. त्यांची काही विधानं नि कृती त्यांच्या नि देशाच्या प्रतिमेला डागाळणाऱ्या ठरल्या. असो.

ब्रँड ॲम्बॅसडर फक्त राष्ट्रीय महत्त्वाच्या वस्तूंचेच बनणारे असे काही अपवादात्मक आदर्श आहेतही. बॅडमिंटन चॅम्पियन नि प्रशिक्षक गोपीचंद, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद असे काही सन्माननीय अपवाद आहेत. त्यांनी राष्ट्रहिताचे ब्रँड ॲम्बॅसडर म्हणून काम केले; व्यापारी कंपन्यांचे प्रतिनिधी बनले नाहीत.
एकूण काय ब्रँड ॲम्बॅसडर म्हणजे फक्त व्यापारी जाहिरात करणारी मॉडेल्स नसतात. त्यांचा स्तर अधिक वरचा असतो. ते लोकहिताचा संदेशही देत असतात. त्यांनी तो द्यावा अशी अपेक्षाही असते. सहज विचार मनात येतो- शुद्ध अभ्यासाचा, शास्त्रीय संगीतासारख्या कलांचा, वैज्ञानिक संशोधनाचा ब्रँड ॲम्बॅसडर कुणाला बनवता येईल? या शुद्ध ज्ञान-विज्ञान-कला क्षेत्रांचा एकच एक ब्रँड असतो का? मग ॲम्बॅसडर कोण बनवणार? स्वामी विवेकानंदांना मात्र भारताचा सांस्कृतिक दूत (कल्चरल ॲम्बॅसडर) म्हटलं जातं ते योग्य नाही का?