बोंडला प्राणिसंग्रहालयाची परिस्थिती बिकट ः राणे

0
11

राज्यातील एकमेव अशा बोंडला प्राणिसंग्रहालायची परिस्थिती बिकट बनलेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मंजूर केलेले दोन वाघ आणले नाहीत, अशी माहिती वनमंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्यात वन्यजीवांसाठी अनुकूल अधिवास निर्माण करण्यासाठी जंगल विकसित करणे आवश्यक आहे. वाघ तेव्हाच जंगलात राहतात जेव्हा त्यांना अन्न आणि अधिवासाची आवश्यक सुविधा असते. त्यांना बोंडला प्राणिसंग्रहालयात ठेवता येणार नाही. कारण हे प्राणिसंग्रहालय खराब अवस्थेत आहे. बोंडला प्राणिसंग्रहालयात वाघासाठी खास विभाग स्थापन करण्याची गरज आहे. प्राणिसंग्रहालयात आवश्यक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मंत्री राणे यांनी सांगितले.

वनविभागाच्या सर्व कामांचे व्यवस्थापन करण्यासाठी नोडल संस्था वनविकास महामंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडे वनविकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधीची मागणी करण्यात आली आहे. जलदगतीने कामे मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

धबधब्यांवर दुर्घटना घडत असल्याने तेथे वनखात्यातर्फे जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. धबधब्यांवर जाणार्‍या पर्यटकांकडून शंभर रुपये शुल्क आकारले जात आहे. पर्यटकांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जात आहे. सुर्ला सत्तरी येथे १२ कॉटेज बांधण्याचा प्रस्ताव आहे. वनाचा विकास करण्यासाठी पाच ते दहा वर्षांचा काळ लागू शकतो, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.