बेफिकिरी भोवली

0
148

ओखी चक्रीवादळामुळे समुद्राला उधाण आल्याने दोन दिवस गोव्याच्या किनारपट्टीवर हाहाकार माजला. सुदैवाने हे चक्रीवादळ गोव्याकडे न सरकता अरबी समुद्रातून मुंबई, कच्छच्या दिशेने गेले आणि गोव्याचा मोठा धोका टळला, अन्यथा राजधानी पणजीसह किनारपट्टीवर काय घडले असते याची कल्पनाही करवत नाही. दक्षिण भारतातील तामीळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये या वादळाने हाहाकार माजविलेला आहे. समुद्राच्या पाण्याच्या या वाढलेल्या पातळीने त्सुनामीच्या आठवणी ताज्या केल्या. गेल्या दोन दिवसांत पाणी किनार्‍यांवर आतवर आल्याने गोव्यात मुख्यतः शॅक्सचे आणि पर्यटन व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याच्या एकूण १०२ कि. मी. च्या किनारपट्टीवरील एकूण नुकसान काही लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवरील ही शॅक्स लॉबी संघटित असल्याने आपल्या झालेल्या नुकसानाची पुरेपूर वसुली सरकारकडून करून घेण्यासाठी ती पुढे होईल. किनारी भागांतील आमदार त्यांचा कैवार घेण्यासाठी सज्ज आहेत आणि सरकारही या पर्यटन व्यावसायिकांबाबत सहानुभूती बाळगून आहे, त्यामुळे लवकरच या आपद्ग्रस्तांसाठी भरघोस भरपाई घोषित होईल. परंतु केवळ नुकसान भरपाई दिल्याने मूळ समस्येची सोडवणूक झाली असे म्हणता येणार नाही. मुळात हे नुकसान का झाले त्याचा विचारही व्हावा लागेल. समुद्राच्या भरती – ओहटीनुसार पाणी किनार्‍यावर येणे – परतणे हा खेळ अहोरात्र चालू असतो. पावसाळ्यात समुद्राला उधाण येते तेव्हा पाणी किनार्‍यावर आतपर्यंत येते आणि जाताना वाळू गिळंकृत करून जाते. किनार्‍यावरील वाळूची धूप अखंड चालत असते. वाळू ही स्थिर नसल्याने वाहत्या वार्‍यानुसार ती एका ठिकाणाहून दुसरीकडे उडत असल्याने तिची छोटी छोटी टेकाडे तयार होत असतात. किनार्‍यावरील जलपर्णी किंवा खारफुटी त्यांची होणारी धूप रोखण्यास महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तिची मुळे वाळूची धूप होण्यास अटकाव करतात. परंतु आपल्या गोव्यात होते असे की, पर्यटक हंगाम सुरू झाला की, किनार्‍यावर थेट भरती रेषेजवळ शॅक्सच्या रूपाने ही बांधकामे केली जातात. त्यासाठी जलपर्णींची सर्रास कत्तल होते. आपल्या शॅकच्या उभारणीसाठी व समोरचा किनारा आकर्षक दिसावा यासाठी वाळूच्या टेकाडांचे बेछूट सपाटीकरण केले जाते. त्यामुळे जेव्हा समुद्राला अशा एखाद्या वेळी उधाण येते तेव्हा वाटेत कोणताही अटकाव नसल्याने पाणी सरळ आत येते. खरे तर समुद्राच्या भरतीरेषेपासून कोणतीही बांधकामे किती अंतरावर करावीत यासंबंधी सीआरझेडचे कडक नियम आहेत. परंतु त्यांना खुंटीवर टांगून ठेवले गेले आहे आणि सरकारनेही त्याकडे कानाडोळा चालवलेला आहे. शॅक्स ही पर्यटकांसाठी केली जाणारी तात्पुरती सोय, परंतु बहुतेक शॅक्समालकांनी कायमस्वरूपी बांधकामे करून ठेवली आहेत. पर्यटकांकडून हे शॅक्सवाले अगदी पंचतारांकित दर आकारत असतात. शेवटी निसर्ग हा निसर्ग असतो. त्याची ताकद अफाट असते. त्यामुळे तो जेव्हा कोपतो तेव्हा तो कोणाची तमा बाळगत नाही. समुद्राचे पाणी वेगाने आत आले तेव्हा शॅक्सवाल्यांची दाणादाण उडाली. त्यांचे झालेले नुकसान टाळता येऊ शकले नसते का? हवामान खात्याने अशा प्रकारच्या उधाण येण्याच्या शक्यतेची पूर्वसूचना दिली असती व ती त्यांच्यापर्यंत पोहोचवली गेली असती तर नुकसान नक्कीच टळले असते वा निदान कमी झाले असते. परंतु आपले हवामान खाते म्हणजे आनंदीआनंदच आहे. खरे तर अत्याधुनिक उपग्रह तंत्रज्ञान उपलब्ध असताना आणि सोशल मीडियासारखे प्रभावी माध्यम हाताशी असताना हवामानासंबंधीची अचूक भाकिते जनतेपर्यंत पोहोचवणे कठीण ठरू नये. परंतु हे कधीच घडत नाही. दुर्घटना घडून गेल्यानंतर निवेदने जारी करून उपयोग काय? मागे फयान वादळ आले होते तेव्हाही पूर्वसूचना दिली गेली नव्हती आणि आता ओखीच्या वेळीही नाही. गोव्यात तर राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था आहे, परंतु तिचे आणि जनतेचे काही नातेच बांधले गेलेले नाही. बेसावध व्यावसायिकांना उधाणाचा फटका बसला. अशा दुर्घटना घडतात तेव्हा त्यापासून काही धडा घेणे अपेक्षित असते. दुर्दैवाने आपल्या देशात ते कधीच घडत नाही. गोव्याची किनारपट्टी ही अशा आपत्तीचा सहज परिणाम होण्याजोगी असुरक्षित आहे हे आजवर अनेकदा दिसून आले आहे, परंतु अशा आकस्मिक आपत्तीला तोंड देण्याची कोणतीही सज्जता प्रशासनापाशी दिसत नाही. सुदैवाने यावेळी प्राणहानी झाली नाही, परंतु प्रत्येकवेळी आपण तेवढे सुदैवी नसू. तेव्हा किनारपट्टीवर बव्हंशी समुद्रसपाटीवर वसलेल्या या राज्यात व्यापक मदत आणि बचावकार्यासाठी सरकारपाशी काय व्यवस्था आहे? शेवटी एनडीआरएफच्या जवानांवरच आपण अवलंबून राहणार आहोत काय?