बेफिकिरीचे बळी

0
7

गोव्याच्या उत्तर टोकाच्या निवांत अशा केरी समुद्रकिनाऱ्यावर चौघा मुलांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. बुडालेल्यांचे वय पाहिले तर ते 12, 16, 17 आणि 25 असे आहे. सेल्फी काढण्याच्या नादात गुंग असताना अचानक आलेल्या जोरदार लाटेने या चौघांना आपल्या कवेत घेतले असे प्रथमदर्शींनी दिलेल्या माहितीवरून दिसते. घडलेली घटना दुर्दैवी आहे, परंतु जे घडले त्याला त्यांचीच बेफिकिरी कारणीभूत ठरली असावी असेच म्हणणे भाग आहे. ज्या भागात ही दुर्घटना घडली, त्या भागात पूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडलेल्या असल्याने तेथे जाऊ नका, सेल्फी घेऊ नका असे निर्देश देणारे फलक सरकारने लावलेले आहेत. तरीही 23 जणांचा हा गट केरीहून किनाऱ्या किनाऱ्याने थेट हरमलच्या गोड्या पाण्याच्या तळ्यापर्यंत जायला निघाला होता. असे साहस करताना किमान सर्वांनी सोबत राहण्याची व पाण्यात न जाण्याची काळजी घेतली जायला हवी होती, तीही घेतली गेली नाही, त्यामुळे चौघांचा हकनाक बळी गेला. समुद्रकिनाऱ्यांवर बुडण्याच्या घटना घडत असल्याने सरकारने राज्यातील किनाऱ्यांवर बचावकार्य करण्याचे कंत्राट दृष्टी लाइफसेव्हिंग प्रा. लि. या खासगी कंपनीला बहाल केलेले आहे. वर्षाकाठी त्यावर जवळजवळ पस्तीस कोटी रुपये खर्च केले जातात. राज्याच्या 41 समुद्रकिनारे व अंतर्भागातील दोन ठिकाणे मिळून साडेचारशे जीवरक्षक सदर कंपनीने नियुक्त केलेले आहेत. केरी किनाऱ्यावरही ते आहेत व ही दुर्घटना घडली तेव्हा स्थानिक जीवरक्षक मदतीला धावून गेले होते असा दावाही ‘दृष्टी’ ने केला आहे. यापूर्वी जेव्हा जेव्हा केरी किनाऱ्यावर अशाच प्रकारच्या घटना घडल्या, तेव्हाही ‘दृष्टी’च्या जीवरक्षकांनी तेथे मदतकार्य केले होते. गेल्या दोन तीन वर्षांतल्याच घटना पाहिल्या, तर केरी किनाऱ्यावर अनेक पर्यटकांना बुडता बुडता वाचवले गेलेले दिसते. 26 जुलै 2020 रोजी हडफड्याहून आलेल्या दोन जोडप्यांना अशाच प्रकारे बुडता बुडता दृष्टीचा जीवरक्षक गिरीश तळकर व सहकाऱ्यांनी वाचवले होते. 11 नोव्हेंबर 2020 रोजी बस्तोड्याच्या पर्यटकांची एक बोट बुडाली, तेव्हा आठजणांना वाचवण्यात आले. 25 डिसेंबर 2020 रोजी बस्तोड्याच्या एका तरुणाला, तर 10 जानेवारी 2021 रोजी एका रशियन पर्यटकाला वाचवण्यात आले. 12 मार्च 2022 रोजी एक जोडपे अशाच प्रकारे बुडता बुडता वाचवले गेले. या सगळ्या दुर्घटना जीवरक्षकांनी वेळीच मदत केल्याने टळल्या. एकदा तर व्हेलेंटिन नावाचा एक रशियन पर्यटक केरीतील आजोबा मंदिरामागच्या किनाऱ्यावरील गुहेत दोन महिने वास्तव्याला असल्याचे आढळून आले होते. जीवरक्षकांची तैनाती खर्चिक जरी असली, तरी अनेक प्राण त्यामुळे वाचू शकले ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. केरीच्या समुद्रात 2018 साली दुर्गा पितांबर नामक एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतरच्या काळात अनेकांना बुडण्यापासून वाचवले गेले. मात्र, परवाच्या दुर्घटनेत चौघांचा बळी गेल्याने समुद्रकिनाऱ्यांवरील बुडण्याच्या घटनांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
गेल्या दोन वर्षांत जीवरक्षकांनी 1286 जणांना वाचवल्याची आकडेवारी उपलब्ध आहे, परंतु त्याचबरोबर गेल्या पाच वर्षांत पाचशे व्यक्तींचा राज्याच्या विविध भागांत बुडून मृत्यू झालेला आहे. यापैकी अनेक बळी हे अंतर्भागातील नद्या आणि धबधब्यांवर गेलेले आहेत. पूर्वी समुद्रकिनाऱ्यांवर सातत्याने पर्यटक बुडण्याच्या घटना घडायच्या. तेव्हा सरकारने समिती नियुक्त केली. त्या समितीने विविध सूचना सरकारला केल्या, त्यानुसार किनारपट्टींवर धोक्याच्या ठिकाणांचा निर्देश करणारे फलक लावले गेले, जीवरक्षकांची कामाची वेळ रात्री साडेआठपर्यंत करावी असाही एक निर्णय घेतला गेला. तरीही पर्यटकांची बेफिकिरी किंवा मद्यपान इ. मुळे बुडण्याच्या घटना घडतात. सरकारने तैनात केलेले जीवरक्षक वेळोवेळी मदतीला धावून जात असले, तरी शेवटी पर्यटकांचीही म्हणून काही जबाबदारी आहे की नाही? केरीच्या दुर्घटनेचे निमित्त करून काँग्रेस पक्षाने सरकारवर निशाणा साधला. सरकारने फलक लावले आहेत, जीवरक्षक तैनात केले आहेत. ते आणखी काय करू शकले असते? पर्यटक म्हणून समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला जाणाऱ्यांनीही किमान स्वतःच्या जिवाची काळजी घ्यायला नको? या गंभीर विषयाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करून राजकीय पक्षांनी स्वतःचे हसे करून घेऊ नये. समुद्र हा शेवटी निसर्गाचा भाग आहे आणि निसर्ग नेहमीच लहरी असतो. तो माणसाचा गुलाम नाही. तो स्वतःच्या मनाने वागतो आणि क्षणात माणसाला त्याच्या क्षुद्रत्वाची जाणीव करून देतो. त्यामुळे निसर्गापुढे जाताना नम्रपणेच जायला हवे हाच केरीच्या शोकांतिकेचा संदेश आहे.