पणजीतील मळा येथील तळ्यामध्ये शेकडो मासे मरून पडल्याची घटना नुकतीच घडली. अशा प्रकारे मासे मरून पडण्याची ही काही येथील पहिलीच घटना नव्हे. पंधरा वर्षांपूर्वीही अशाच प्रकारे शेकडो मासे मरून पडल्याचे आढळून आले होते. या घटनेत मासे मेले, माणसे नव्हेत, त्यामुळे ह्या घटनेचे गांभीर्य कोणाला जाणवले नाही. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे मासे मरून पडण्यास नागरिक आणि प्रशासनाची बेपर्वाई आणि हलगर्जीच कारणीभूत आहे. अशी एखादी दुर्घटना घडते तेव्हाच गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ खडबडून जागे होते. तोवर ते कुंभकर्णासारखे झोपलेले असते. आता त्यांनी केलेल्या तपासणीत हे मासे मृत्युमुखी पडण्यास तळ्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाले हे कारण असल्याचे आढळले आहे. तळ्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होण्याचे कारण शोधायला गेले, तर आत्यंतिक प्रदूषण हेच एकमेव कारण दिसते. घरांतील सांडपाणी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये थेट सोडून देण्याचे प्रकार पणजी शहरात आणि आजूबाजूच्या परिसरांत सर्रास पाहायला मिळतात. स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी यंत्रणा डोळ्यांवर कातडे पांघरून त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. ही समस्या केवळ मळा भागातील तलावाचीच नाही, तर सांतिनेज खाडीचीही आहे. पणजी हे एकेकाळी अत्यंत सुंदर, नियोजित शहर होते. रस्त्यांची रेखीव आखणी, भरती ओहटीमुळे पूर येऊ नये म्हणून भूमिगत जलनिःस्सारण व्यवस्था अगदी पोर्तुगीज काळात ह्या शहरात राबविली गेली होती. अलीकडे पणजी शहर स्मार्ट करण्याच्या नावाखाली त्या भूमिगत व्यवस्थेची वासलात लावली गेलीच, परंतु ती लावत असताना असंख्य घरांतील आणि व्यवसायांचे सांडपाणी केवळ पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या गटारांत थेट सोडण्यात आल्याचे आढळून आले. मात्र, त्याबाबत ना पणजी महानगरपालिकेने काही कारवाई केली, ना आरोग्य खात्याने, ना प्रदूषण नियंत्रण मंडळाने. पणजीच नव्हे, तर पणजीच्या उपनगरांत फोफावलेल्या मोठमोठ्या निवासी इमारतींच्या सांडपाणी व्यवस्थेबाबत सगळा आनंदीआनंद आहे. ह्या इमारतींचे सांडपाणी थेट शेतांत सोडण्यात आले आहे. शेते नापिक झाली आहेत. सरकारमधील मंत्र्यांच्या कृपेने तेथे भर शेतांमध्ये प्रचंड मोठे निवासी प्रकल्प उभे केले जात आहेत. मध्यंतरी पणजी स्मार्ट सिटी तसेच मलनिःस्सारण वाहिनीच्या कामांवर कोट्यवधी रुपये अक्षरशः उधळण्यात आले. आजही पणजीवासीयांना मलनिःस्सारण नीट होत नसल्याने सदान्कदा दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याचे आणि स्मार्ट सिटी मिशनखाली नव्याने बनवलेल्या सिमेंटच्या रस्त्यांची फोडाफोडी चाललेली दिसते. पणजी महानगरपालिका हे तर वर्षानुवर्षे केवळ भ्रष्टाचाराचे आगर बनले आहे. त्यांचे जनतेच्या सुखदुःखाशी, समस्यांशी काही देणेघेणे आहे असे वाटत नाही. सांतिनेजची खाडी पणजी शहराच्या मध्यवस्तीतून वाहते. आज तिला अक्षरशः गटाराचे स्वरूप आलेले आहे. तिच्या काठी प्रचंड दुर्गंधी आहे. परदेशात अशी खाडी किंवा कालवे शहरातून वाहत असतील तर तेथे सौंदर्यीकरण केलेले असते, त्यातून नौकाविहार चालतात. पणजीचे व्हेनिस बनवणे तर दूरच, उलट जी खाडी आहे ती तिच्या मूळ स्वरूपात सांभाळणेही जर जमत नसेल तर असल्या कुचकामी स्थानिक स्वराज्य संस्था, महापौर आणि आमदार हवेत कशाला? मध्यंतरी एका बड्या समूहाचे पंचतारांकित हॉटेल ह्या खाडीच्या काठी उभे करण्यास परवानगी मिळाली, तेव्हा रातोरात हुकूम सुटले आणि खाडीची तातडीने स्वच्छता काय केली गेली, जाळ्या काय बसवल्या गेल्या. परंतु स्वच्छता त्या हॉटेलपुरतीच झाली. बाकी खाडीला गटाराचे स्वरूप कायम राहिले. खाडीच्या काठच्या घरांचे, व्यवसायांचे सांडपाणी थेट खाडीत सोडले जाते त्यावर महापालिका काही कारवाई करणार की नाही? आता सांडपाणी निचऱ्यासाठी शंभर कोटी खर्चिले जाणार आहेत. पणजी शहराला मध्यंतरी केंद्र सरकारने स्वच्छ शहर म्हणून गौरविले. इव्हेंटबाजीचा हा कळस म्हणायला हवा, कारण भाटले भागात रस्त्याच्या कडेचा कचरा आणि मळ्यातील प्रदूषित तळे व सांतिनेजचे वाहते गटार जर ह्या महाभागांनी पाहिले असते, तर पणजीला स्वच्छ म्हणण्यास ते धजावले नसते. मळा तळ्यात मासे मरून पडले, ते तळे प्रदूषित झाले ह्याचे मुख्य कारण रूआ द औरे खाडीशी असलेला त्या तळ्याचा पारंपरिक संपर्क मातीचे भराव टाकून बुजवला गेलेला आहे. त्या खाडीच्या काठी तर बड्या बिल्डरांनी मोठमोठे भराव घालून प्रकल्प उभारले आणि तिचा श्वास कोंडला. गोव्यातील स्वतःला पर्यावरणवादी म्हणवणारी जमात ह्या सगळ्याविषयी ब्र काढताना कधी दिसत नाही. त्यामुळे जनताही ‘हे असेच चालायचे’ असे मानू लागली आहे. इथे माणसांच्या मरणाचे सोयरसुतक कोणाला नाही, तर माशांचे काय!