>> पोलिसांकडून चौघेजण ताब्यात
अज्ञातांनी बंदुकीच्या गोळ्या झाडल्यामुळे सचिन कुट्टीकर (33, गटमड- उसगाव) हे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना काल शुक्रवारी सकाळी 6 च्या सुमारास बेतोडा येथील धोकादायक जंक्शनवर घडली. सचिन कुट्टीकर यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी तसेच दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधामुळे दुचाकी घेऊन आलेल्या दोन अज्ञातांनी बंदुकीने गोळीबार केल्याचा संशय जखमी सचिन यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेत संध्याकाळी उशिरा पोलिसांनी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
शुक्रवारी सकाळी सचिन कुर्टीकर हे दुचाकीने (जीए 05 व्ही 6563) जात होते. बेतोडा जंक्शनजवळ पोहोचताच पाठीमागून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या व पलायन केले. गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर स्थानिकांनी त्वरित पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस वाहनातून सचिन यांना प्रथम उपजिल्हा इस्पितळात व नंतर गोमेकॉत नेण्यात आले. बंदुकीची गोळी सचिन यांच्या पोटाच्या उजव्या बाजूने आरपार गेली. पोलिसांनी 7.65 एमएमची गोळी जप्त केली आहे.
उपअधीक्षक अर्शी आदिल, निरीक्षक तुषार लोटलीकर व दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या जागी पंचायतीने बसवलेला सीसी टीव्ही कॅमेरा बंद असल्याचे पोलिसांना आढळून आले. जखमी सचिन यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत अनैतिक संबंधाच्य संशयातून हा गोळीबार केल्याचा संशय व्यक्त करत गोळी झाडणाऱ्यांना ओळखत नसल्याचे सांगितले. सचिन कुर्टीकर हे बोरी परिसरात ट्रकचालक म्हणून काम करीत आहेत.