आरक्षणाबाबत भाजपकडून दिशाभूल ः काँग्रेस

0
2

राज्यातील भाजप नेते राजकीय आरक्षणावरून अनुसूचित जमातीच्या (एसटी) लोकांना फसवत आहेत आणि त्यांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप काल गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांनी घोषित केलेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा गोव्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय हा एक निवडणूक ‘जुमला’ आहे, असा आरोप पाटकर यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला नेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यांनी केवळ स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांनाच नेले. कारण त्यांना वस्तुस्थिती लपवायची होती असा आरोप पाटकर यांनी केला.

एसटी राजकीय आरक्षण ही धूळफेक असून भाजप काहीही करणार नाही. हा फक्त मंत्रिमंडळाचा निर्णय आहे, ते संसदेत आणतील याची काय हमी आहे का, असा सवाल माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांनी केला. यावेळी सांत आंद्रे गटाचे अध्यक्ष मनोज पालकर, काँग्रेस नेते रामकृष्ण जल्मी यांची उपस्थिती होती.