बूल ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करणारे दोन ट्रॉलर पकडले

0
128

>> कुटबण-बेतूल येथे कारवाई

>> पोलिसात तक्रार

बूल ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करणार्‍या दोन ट्रॉलर्सना कुटबण-बेतूल येथील मच्छिमार्‍यांनी रंगेहाथ पकडल्याने वास्कोतील गोवा मच्छीमारी ट्रॉलर्स मालक संघटनेचे सदस्य संतापले असून काल त्यांनी मुरगाव पोलिसात कुटबण येथील सहाजणांविरुद्ध तक्रार नोंदविली आहे.
बंदी असतानाही बुल ट्रॉलिंग पद्धतीने
मासेमारी करणारे ट्रॉलर मालक गास्पर डिसोझा व एडमंड ङ्गर्नांडिस यांचे ट्रॉलर पकडून कुटबणला नेले आहेत. ते बेकायदेशीररित्या नेल्याचे या ट्रॉलर मालकांनी सांगून कुटबण बेतूल येथील सावियो सिल्वा, पुंडलिक केरकर, लेस्ली कार्दोझ, क्रिझा सिल्वा, अजित चोडणकर, विनय तारी यांच्या विरोधात रितसर तक्रार करून ट्रॉलरमधील मासळी आणि ट्रॉलरची नासधूस करून सुमारे लाखभर रुपयांचे नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
बूल ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करण्यास बंदी असतानाही वास्कोतील ‘डिवाईन स्टार’ आणि ‘मिलाग्रीस सायबीण’ हे दोन ट्रॉलर्स नियमाचा भंग करून बूल ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करीत होते. हे दोन्ही ट्रॉलर मासेमारी करताना येथील मच्छीमारांच्या निदर्शनास आल्यावर कुटबण येथील मच्छीमारांनी दोन्ही ट्रॉलर्स व कामगारांना ताब्यात घेऊन कुटबणला आणले. याप्रकरणी मरीन पोलिसांकडे तक्रार करून ते दोन्ही ट्रॉलर्स व कामगारांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, या प्रकरणी वास्कोतील गोवा मच्छीमारी ट्रॉलर्स मालक संघटनेने गंभीर दखल घेऊन कुटबण येथील सहा ट्रॉलर्स मालकांविरोधात मुरगाव पोलिसात तक्रार केली आहे. जप्त केलेले ट्रॉलर्स मालकांना परत करावे तसेच नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या संघटनेने केली आहे. सुमारे ५० पेक्षा अधिक ट्रॉलर मालक मुरगाव पोलीस स्थानकात जमा झाले होते.
मुरगाव पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी वास्कोतील ट्रॉलर मालकांचे म्हणणे ऐकले. त्यांनी लगेच कुटबणच्या मरीन पोलिसांकडे तसेच मच्छीमार खात्याच्या संचालकांकडे बोलणी करून अधिक माहिती जाणून घेतली. याप्रकरणी रितसर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी ट्रॉलर मालकांना दिले.