बूल ट्रॉलिंग, एलईडीद्वारे मासेमारीवर बंदी

0
153

>> मत्स्यद्योगमंत्री विनोद पालयेकर यांची माहिती

एलईडी दिव्यांचा वापर करून तसेच बूल ट्रॉलिंग पद्धतीने मच्छिमारी करण्याची ती घातक पद्धत आहे त्यावर बंदी घालण्याचा निर्णय मच्छिमारी खात्याने घेतला आहे, असे मच्छिमारी मंत्री विनोद पालयेकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. बूल ट्रॉलिंग व एलईडी दिव्यांचा वापर करून करण्यात येणार्‍या मासेमारीवर देशभरात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवणार असल्याचे पालयेकर यांनी सांगितले.

वरील प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी काल किनारपट्टी राज्यांची एक बैठक झाली. ह्या बैठकीत गोव्याबरोबरच केरळ, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. गोव्याबरोबरच केरळ राज्यानेही एलईडी व बूल ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करण्यास आपला विरोध असल्याचे सांगितले. मात्र, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांचा त्याला पाठिंबा मिळू शकला नसल्याचे पालयेकर यांनी स्पष्ट केले.

बूल ट्रॉलिंग व एलईडीद्वारे मच्छिमारी चालूच राहिली तर २०४८ सालापर्यंत समुद्रात मत्स्य दुष्काळ पडणार असल्याचे तज्ज्ञांचा म्हणणे आहे, असे पालयेकर यांनी ह्या वेळी सांगितले. कर्नाटक व महाराष्ट्र ह्या राज्यांचा पाठिंबा मिळालेला नसला तरी गोवा सरकार मात्र बूल ट्रॉलिंग व एलईडीद्वारे मच्छिमारी करण्यावर बंदी घालेल, असे पालयेकर यांनी सांगितले.
बूल ट्रॉलिंग व एलईडीद्वारे मच्छिमारी करणे चालूच राहिल्यास भविष्यात मत्स्य दुष्काळ पडणार असून गोव्यातील पारंपरिक मच्छिमारांवर उपासमारीची पाळी येणार आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्ड पक्षाचा वरील पद्धतीने मच्छिमारी करण्यास पूर्ण विरोध असल्याचे पालयेकर यांनी सांगितले. बूल ट्रॉलिंग व एलईडीद्वारे मच्छिमारी करण्यावर बंदी आणण्यासाठी गरज भासल्यास कायद्यात आणखीही दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे पालयेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

१२ समुद्री मैलांपर्यंत बूल ट्रॉलिंग व एलईडीद्वारे मच्छिमारी करण्यावर बंदी असल्याचे यावेळी मच्छिमारी खात्याचे संचालक गोविंद जयस्वाल यांनी सांगितले.