‘बूँद से गयी वह हौद से नही आती’ अशी अकबर – बिरबलाची एक प्रसिद्ध कथा आहे. मडगावचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर हे निवडून येताच दोनच दिवसांत त्यांच्यावर अविश्वास ठराव आणणार्या मंडळींनी ही गोष्ट जरूर वाचावी. मडगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जे घडले ते घडून गेले. त्यातून जी लाज गेली, ती गेलीच. आता नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणून, नवनिर्वाचित नगराध्यक्षांना त्या खुर्चीवरून खाली उतरवून दिगंबर गट आणि मूळ भाजप गट यांच्यात सगळे काही आलबेल आहे असे दाखवण्याची कितीही केविलवाणी धडपड जरी केली, तरी ती गेलेली लाज काही परत मिळणारी नाही. पडलेल्या अत्तराच्या थेंबाला टिपून घेणार्या अकबर बादशहाने भले लाज वाटून दुसर्या दिवशी अत्तराने हौद जरी भरला तरी आधल्या दिवशी गेलेली त्याची लाज काही त्याला परत मिळाली नाही.
वास्तविक दिगंबर कामत यांच्या पक्षांतरामुळे मडगावची प्रतिष्ठेची नगरपालिका आपल्या ताब्यात येईल अशा सुखस्वप्नांत सत्ताधारी पक्षाचे नेते दंग झाले होते. दिगंबर यांनी पक्षांतरानंतरही आपल्याला मडगावात किती समर्थन आहे ते दाखवण्यासाठी स्वतःच्या उमेदवारास नगराध्यक्षपदासाठी अर्जही भरायला लावला. परंतु प्रत्यक्षात जेव्हा निवडणूक झाली तेव्हा मूळ भाजपच्या नगरसेवकांनी त्याला मतदान न करता घनश्याम शिरोडकर ह्या गोवा फॉरवर्ड समर्थित स्वतंत्र उमेदवाराच्या बाजूने मते टाकून दिगंबर कामत आणि त्यांना भाजपात प्रवेश देणारे नेते या दोहोंना व्यवस्थित दणका दिला तो दिलाच. आपण दिल्लीत होतो, त्यामुळे आपल्या नगरसेवकांशी नीट संवाद साधू शकलो नाही वगैरे युक्तिवाद कामत यांनी केले, परंतु जे घडले ते सगळ्या गोव्यासमोर घडले आहे. अगदी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नको एवढा रस घेऊन निवडणुकीच्या आधल्या रात्री दिगंबर आणि भाजप समर्थक नगरसेवकांचे मनोमीलन करण्याचा प्रयत्नही करून पाहिला होता, परंतु तीही भाजपच्या नगरसेवकांच्या मनातील खदखद संपुष्टात आणू शकली नाही. त्यामुळेच त्याचा फायदा घनश्याम शिरोडकर यांना तेव्हा मिळाला. नेहमी देवाला पुढे करणार्यावर ‘देव कोपला’ असे आम्ही तेव्हा लिहिले होते.
आता केवळ ही नगरपालिका स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्षांविरुद्ध अत्यंत अल्पावधीत अविश्वास ठराव आणून तिथे आपला नगराध्यक्ष बसवण्याचा जो काही अट्टहास सत्ताधारी पक्षाने धरला आहे तो लोकशाहीचे धिंडवडे काढणारा आहे. नगरसेवकांनी राजीखुशीने केलेले मतदान ग्राह्य न धरता त्यांना जांबावलीला नेऊन श्रीदामोदरासमोर शपथ घ्यायला लावणे वगैरे हे जे काही चाळे चालले आहेत, ते देवाचा अवमान करणारेच आहेत. तुमच्या घाणेरड्या राजकारणात बिचार्या दामबाबाला भरीला का घालता आहात? हा सगळाच प्रकार केविलवाणा आणि लज्जास्पद आहे.
नगराध्यक्षांची झालेली निवडणूक ही कोणत्याही गैरप्रकाराविना गुप्त मतदानाने झाली होती. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या मनाला पटेल तो कौल त्या मतदानावेळी दिला. मग आता रीतसर निवडून आलेल्या नगराध्यक्षाला त्या खुर्चीवरून उतरवण्याचा अट्टहास का? केवळ तो आपल्या गटाचा नाही म्हणून? आता जोरजबरदस्तीने आपल्या नगरसेवकांना पक्षाने जरी अविश्वास ठराव संमत करायला लावले आणि तेथे आपला नगराध्यक्ष बसवला, तरी त्यातून जे गेल्या आठवड्यात घडले ते पुसले जाणार आहे होय? मांद्रेच्या सरपंचपदी निवड झालेल्या पंचाने माजी आमदाराशी एकनिष्ठता दर्शवताच लगोलग विद्यमान आमदाराने त्याला खाली उतरवण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली होती. तेव्हा त्याच्या नावाने बोटे मोडणारी मंडळी आज त्याच वाटेने निघालेली दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी कसा आटापिटा चालतो त्याचा प्रत्यय अशा प्रकारच्या घटना देतात. एकीकडे पक्षनिरपेक्ष निवडणुकांचा आव आणायचा आणि दुसरीकडे पक्षाची पकड बसवण्यासाठी धडपडायचे हे कितपत योग्य याचा विचार जनतेनेही करायला हवा.
नगरपालिका मंडळे असोत किंवा ग्रामपंचायती असोत, ती सत्ताधारी आणि विरोधक यांच्या शक्तिप्रदर्शनाची केंद्रे बनू नयेत. ती शहरांच्या आणि गावांच्या चौफेर विकासाची महाद्वारे बनली पाहिजेत. मडगाव शहराला कचर्यापासून वाहतूक कोंडीपर्यंत नाना समस्यांनी ग्रासले आहे. नूतन नगरपालिका मंडळ एकदिलाने शहराच्या ह्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार की आपसातील ह्या अशा घाणेरड्या राजकारणाचा तमाशा जनतेला दाखवत नगरपालिकेलाही सोनसड्याचा उकिरडा बनवणार?