दिल्लीमध्य झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाच्या तपासात जे षड्यंत्र उघडकीस आले आहे, ते थरकाप उडवणारे आहे. फरिदाबादेत वेळीच जवळजवळ 2900 किलो स्फोटकांचा साठा सापडला आणि ह्या कटाचे बिंग फुटले. आपले सगळे साथीदार पकडले गेल्याने सैरभैर झालेल्या त्यांच्या एका साथीदाराने मग दिल्लीत लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट घडवला. परंतु स्फोटकांचा शोध वेळीच लागला नसता, तर जे घडले असते ते भीषण असते ह्यात शंका नाही. दिल्ली स्फोटाच्या काही दिवस आधी दिल्ली विमानतळावर उतरणाऱ्या वैमानिकांकडून जीपीएस स्पूफिंग होत असल्याची म्हणजेच खोटे जीपीएस सिग्नल दिले जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. प्रस्तुत दहशतवादी कटाशीच त्याचे धागेदोरे असू शकतात. अटक झालेला एक दहशतवादी द्रोनमध्ये बदल घडवून म्हणजे त्यांना अधिक शक्तिशाली बॅटऱ्या जोडून जास्त वजन उचलण्याची क्षमता निर्माण करण्यात गुंतलेला होता. मोठ्या प्रमाणावर स्फोटके वाहून नेण्यासाठी ह्या द्रोनचा वापर केला जाणार होता हे उघड आहे. ह्या दहशतवादी कटातील व्यक्तींचा तुर्कियेशी संपर्क होता हेही बोलके आहे. पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये दणका बसल्याने आता दूरच्या तुर्कियेची मदत घेऊन हे कटकारस्थान आखले जात असावे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध संघर्ष झडला तेव्हा सीमेपलीकडून शेकडो द्रोनद्वारे कसे हल्ले चढवले गेले हे आपण पाहिले आहे. आता सीमेच्या आतून आपल्याच देशातील गद्दारांच्या मदतीने आपल्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हे द्रोन हल्ले चढवण्याचा हा अत्यंत गंभीर कट होता. तो प्रत्यक्षात आला असता तर काय हाहाकार उडाला असता हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दिल्लीच नव्हे, तर अयोध्येचे राममंदिरदेखील ह्या कटाचे लक्ष्य होते. अशा प्रकारचे हल्ले आपल्या देशात कधी घडलेले नसले, तरी सीरिया, इराक, अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांकडून द्रोनद्वारे दहशतवादी हल्ले सर्रास चढवले गेले आहेत. त्यामुळे देशांतर्गत गद्दारांसाठी हे काही कठीण नव्हते. त्यासाठी स्फोटकांची, द्रोनची जमवाजमव चालली होती. सुदैवाने वेळीच ह्या कटाचे बिंग फुटले आणि काही लोक गजाआड झाले. परंतु अटक झाली आहे, तेवढ्यांपुरताच हा कट सीमित असेल असे मानण्याचे काही कारण नाही. हा कट अधिक व्यापक असू शकतो, अधिक दूरवर त्याचे धागेदोरे पसरलेले असू शकतात, अधिक माणसे त्यात गुंतलेली असू शकतात. त्यामुळे वेगाने ह्या कटकारस्थानाच्या मुळाशी जाणे जरूरी असेल. देशांतर्गत संभाव्य द्रोनहल्ल्यांची दाट शक्यता लक्षात घेऊन त्यासाठी आपण सज्जता बाळगण्याची नितांत जरूरी आहे. कोणताही प्रसंग जनतेवर ओढवतो तेव्हा मदत मागण्यासारखी पहिली यंत्रणा असते ती म्हणजे पोलीस. त्यामुळे ह्या पोलीस दलालाच द्रोन हल्ल्यासारख्या संकटाला तोंड देण्यासाठी सरकारने आधी सज्ज केले पाहिजे. प्रत्येक राज्याच्या, प्रत्येक मोठ्या शहराच्या वा महत्त्वाच्या स्थळांना सुरक्षा देणाऱ्या पोलीस दलांतर्गत अँटी द्रोन पथके तातडीने स्थापन झाली पाहिजेत. सर्व राष्ट्रीय महत्त्वाच्या ठिकाणांवर तातडीने द्रोनबंदी अमलात आणली पाहिजे. तेथे द्रोनविरोधी यंत्रणा बसवल्या गेल्या पाहिजेत. मोबाईल जॅमर असतात तसे आरएफ सिग्नल जॅमर्स लावले गेले पाहिजेत. तरीही आकाशात द्रोन दिसली तर ती तातडीने पाडणारी हाय एनर्जी लेझर यंत्रणेसारखी यंत्रणा सुसज्ज ठेवली पाहिजे. आपली डीआरडीओ अशा प्रकारची द्रोनविरोधी आयुधे तयार करते आहे. आज द्रोन ही सर्रास खुल्या बाजारात किंवा ऑनलाइन विकत मिळतात त्यावर तातडीने बंदी आली पाहिजे. त्यासाठी सशर्त परवाना पद्धत लागू करावी लागेल. आजकाल कोणीही उठतो आणि द्रोनद्वारे छायाचित्रण करताना दिसतो. द्रोनमध्ये बदल करून त्याचा दहशतवादी हल्ल्यासाठी वापर करणे सोपे असल्याने अशा प्रकारच्या हौशी द्रोन फोटोग्राफीवर निर्बंध आणावे लागतील. तंत्रज्ञान जसजसे प्रगत होत जाते, तसतशा वाईट प्रवृत्तीही त्याचा अवलंब आपले दुष्ट मनसुबे साकारण्यासाठी करू शकतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. दिल्ली स्फोटाच्या तपासातून द्रोनद्वारे दहशतवादी हल्ल्याचा कट उजेडात आला आहे. कोणत्याही दहशतवादी हल्ल्यामध्ये नावीन्याला महत्त्व असते. आजवरचे जे सर्वांत प्रभावी ठरलेले दहशतवादी जगाच्या इतिहासात नोंदवले गेले आहेत, त्यामध्ये अशाच प्रकारच्या नावीन्याचा अवलंब केला गेलेला दिसेल. जे कोणाच्या ध्यानीमनीही नसेल त्या मार्गाने दहशतवादी हल्ला चढवल्यास तो रोखण्याची सुरक्षादलांची क्षमता कमी असते हे त्यामागील तत्त्व आहे. त्यामुळे हे जाणून आपली दहशतवादविरोधी नीती सुसज्ज करावी लागेल. दहशतवाद्यांच्या वेगापेक्षा आपला वेग जास्त राहिला तरच अशा संकटांवर आपण वेळीच मात करू शकू आणि निष्पापांचे प्राण वाचवू शकू.