बिगर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली; वर्दळ वाढली

0
170

 

लॉकडाऊनच्या काळात केंद्रीय गृहमंत्रालयाने आर्थिक  व्यवहार आणखीन वाढ करण्यासाठी नियम आणखी शिथिल केले आहेत. त्यामुळे राज्यभरातील बिगर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू करण्यात आल्याने बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ वाढत चालली असून स्थानिक प्रशासनाने जास्त सतर्कता बाळगण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण नसले तरीही बेफिकीर राहणे घातक ठरू शकते. बांबोळी येथील गोमेकॉच्या खास कोरोना विभागात दर दिवशी कोरोना संशयित रुग्ण दाखल होत आहेत. त्यांच्यावर उपचार करून घरी पाठविले जात आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

राज्यात सलून, मद्यविक्री आदी काही दुकानांना राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. पणजी शहरातील काही हॉटेल सुरू करण्यात आली आहेत. शहरात सुरू केलेल्या हॉटेलमध्ये केवळ ऑर्डर स्वीकारून पार्सल दिली जात आहेत. बिगर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू करण्यास मान्यता देण्यात आल्याने पणजी महानगरपालिका क्षेत्रातील विविध वस्तू, सामानाची विक्री करणारी अनेक दुकाने उघडण्यात आली आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून सामसूम असलेले राजधानी पणजी शहर पुन्हा एकदा गजबजू लागले आहे. शहरात दुचाकी, चार चाकी वाहनांची वर्दळ वाढलेली आहे.

महानगरपालिकेचे मुख्य मार्केट सुरू करण्यात आलेले नाही. या मार्केटमधील जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी भुसारी दुकाने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. भाजी, फळ विक्री व इतर दुकाने पूर्णपणे बंद आहेत. महानगरपालिका प्रशासन भाजी, फळांच्या विक्रेत्यासाठी खुल्या जागेत तात्पुरती सोय करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. काही खासगी दुकानात सामाजिक अंतराचे पालन होत नसल्याची तक्रार आहे.