बाहेरून येणार्‍यांसाठी नवे नियम आजपासून

0
181

परराज्यातून गोव्यात येणार्‍या लोकांसाठी आज गुरुवारपासून नवी ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ (एसओपी) लागू करण्यात येणार असून ज्या लोकांमध्ये कोरोनाची कसलीच लक्षणे दिसून येणार नाहीत व ज्यांच्याकडे आपण कोरोना मुक्त असल्याचे ४८ तासांपूर्वीचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल व ज्यांची गोव्यात आल्यानंतरही चाचणी करून घ्यायची तयारी नसेल अशा लोकांना त्यांच्या कुटुंबियांसह १४ दिवस त्यांच्या घरी सामाजिक विलगीकरणात रहावे लागेल. त्यांच्या हातांवर ‘होम क्वारंटाईनचा’ शिक्का मारण्यात येईल. त्यामुळे अशा संपूर्ण कुटुंबाला घराबाहेर पडता येणार नाही. दरम्यान, राज्यात येणार्‍या सर्वांचे आता थर्मल स्क्रिनिंग होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.

स्वतःच्या घरी विलगीकरणात ठेवण्यात येणार्‍यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्थानिक नगरसेवक अथवा पंच सदस्य यांच्यावर असेल. तसेच त्यांच्या आरोग्यासंबंधीची काळजी घेण्याबरोबरच त्यासंबंधीची सगळी माहिती गोळा करण्याची जबाबदारी जवळच्या आरोग्य केंद्रावर असेल, असे सावंत यांनी पुढे सांगितले.

ज्या लोकांमध्ये कोरानाची लक्षणे दिसून येतील अशा लोकांची मात्र सक्तीने चाचणी करण्यात येईल. चाचणीत त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे आढळून आल्यास त्यांना कोविड इस्पितळात हलवण्यात येईल. अहवाल हाती येईपर्यंत त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार असून त्यासाठी त्यांना पैसेही भरावे लागतील.

कोरोनाची लक्षणे नसलेल्यांकडे आपणाला कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे प्रमाणपत्र नसेल व गोव्यात आल्यानंतर चाचणी करून घ्यायची त्यांची तयारी असेल तर पैसे भरून त्यांना चाचणी करून घ्यावी लागेल. त्यानंतर अहवाल येईपर्यंत त्यांना संस्थात्मक विलगीकरणात रहावे लागेल. आणि जर चाचणी करायची असेल तर त्यांना स्वतःच्या घरात कुटुंबियांसह विलगीकरणात रहावे लागेल.

सर्वांशी चर्चेनंतरच
नवी एसओपी
नव्या एसओपीनुसार ज्या लोकांमध्ये रोगाची लक्षणे नसतील त्यांना चाचणी करून घेणे सक्तीचे नसेल. मात्र, त्यांच्यावर स्वतःच्या कुटुंबियांसह १४ दिवस स्वतःच्या घरी सामाजिक विलगीकरणात राहण्याचे बंधन असेल. मात्र, त्यांनी चाचणी करून घेतल्यास त्यांच्यावर वरील बंधन नसेल. यासंबंधी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही चाचण्या करणे बंद केलेले नाही. पण रोज मोठ्या संख्येने लोक येत असल्याने सर्वांच्याच चाचण्या करणे शक्य होत नसल्याने रोगाची लक्षणे नसलेल्या लोकांना चाचण्यां ऐवजी स्वतःच्या घरात सामाजिक विलगीकरणात राहण्याचा पर्याय दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मांगूर हिलमध्येही तपासण्या होणार
आम्ही चाचण्या करणे बंद केलेले नसून मांगूर हील येथे आता ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ६ वर्षांखालील मुले अशा वयोगटातील लोकांच्या कोरोनासाठी चाचण्या करण्यात येतील. वरील वयोगटातील लोकांच्या जीवाला कोरोनापासून जास्त धोका असल्याने त्यांच्या चाचण्या घेण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.