बालाकोटचे सत्य

0
225

लवामा हल्ल्याचा सूड उगवण्यासाठी भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार करून तडक खैबर पख्तुनख्वामधील बालाकोटमधील दहशतवादी तळावर बॉम्बगोळे फेकले होते. त्या हल्ल्यात भारताच्या दाव्याप्रमाणे खरोखरच ३०० दहशतवादी मारले गेले होते, अशी कबुली पाकिस्तानच्या आगा हिलाली नामक एका उच्चाधिकार्‍याने नुकतीच त्या देशातील एका टीव्ही चर्चेच्या निमित्ताने दिली आहे. हे आगा हिलाली काही कोणी भारताचे हस्तक नव्हेत. ते नेहमी पाकिस्तानी लष्कराची बाजू घेऊन दूरचित्रवाणीवरील चर्चांमध्ये भारताला शिव्याशाप देत असतात. परंतु अशा भारतद्वेष्ट्या उच्चाधिकार्‍याने बालाकोटसंदर्भात दोन वर्षांनंतर का होईना, दिलेली ही कबुली या कारवाईबाबत प्रश्नचिन्हे उपस्थित करणार्‍या आपल्या देशातील शंकेखोरांनाही जबर चपराक लगावणारी आहे.
पुलवामाचा सूड उगवण्यासाठी बालाकोटवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा ते सगळे मोदींनी केलेले नाटक होते असे अकांडतांडव कॉंग्रेस पक्षाने चालवले होते. कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि मंडळी तर बालाकोटच्या त्या हल्ल्याची आजवर सतत टवाळीच करीत आली. परंतु आता पाकिस्तानच्याच एका ज्येष्ठ अधिकार्‍याने ह्या हल्ल्यातून झालेल्या प्राणहानीची कबुली दिली असल्याने आपले दात घशात घालण्याची पाळी कॉंग्रेसवर आली आहे.
खरे तर बालाकोट हल्ल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे आपल्या हवाई दलाच्या विश्वासार्हतेवरच शंका घेण्यासारखे होते. बालाकोट कारवाईच्या यशस्विततेचे पुरावेही हवाई दलाने व्हिडिओ जारी करून दिलेले होते. तरी देखील सदर कारवाईत कोणतीही प्राणहानी झाली नाही या पाकिस्तानच्या सारवासारवीची री ओढत आपल्याच सैन्यदलांबाबत अविश्वास व्यक्त करणार्‍यांनी त्यातून काय बरे साधले? राजकारणापेक्षा देशहित महत्त्वाचे असते याचा कॉंग्रेसपासून डाव्यांपर्यंत भारतातील अनेक राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना त्यावेळी विसर पडला. त्यामुळेच बालाकोटच्या सत्यतेविषयी प्रश्न विचारण्याची त्यांना हिंमत झाली. पाकिस्तान आपल्या भूमीत झालेल्या हल्ल्याने कसा हादरून गेला होता, त्याचे वर्णन काही महिन्यांपूर्वी नवाज शरीफांच्या पाकिस्तानी मुस्लीम लीग (नवाज) चे नेते अजाझ सादिक यांनी तत्कालीन सर्वपक्षीय बैठकीतील वातावरणाचे वर्णन करून केले होते. पाकिस्तानी विदेशमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवून भारताने केलेल्या हवाई हल्ल्याची माहिती दिली तेव्हा तेथे उपस्थित असलेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा कसे हादरून गेलेले होते आणि त्यांचे पाय कसे लटपटत होते त्याचे वर्णन सादिक यांनी केले होते. इम्रान खान सरकारने भारत अधिक जोरदार हल्ला चढवील या भीतीनेच अभिनंदन वर्धमानला बिनशर्त भारतात परत पाठवल्याचा आरोपही त्यांनी तेव्हा केला होता.
भारतातील शंकासुरांना मात्र आजही आपल्याच सैन्यदलांवर विश्वास दिसत नाही. उरी हल्ल्याचा सूड उगवण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रणरेषेपार जाऊन सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले तेव्हाही त्यांच्या सत्यतेविषयी सवाल राहुल आणि मंडळींनी केलेले होते. पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटची कारवाई झाली तेव्हा देखील असे काही घडलेच नाही असे म्हणेपर्यंत त्यांची मजल गेली होती. हवाई दलाने हल्ल्याचा व्हिडिओ जारी केला, उपग्रह छायाचित्रे जारी झाली तरी देखील ह्या हल्ल्यातून कोणतीही प्राणहानी झाली नाही या पाकिस्तानच्या दाव्याचीच ही मंडळी री ओढत राहिली. पाकिस्तान सरकार कोणत्या तोंडाने झालेल्या प्राणहानीची कबुली देणार होते? तसे करणे त्यांना त्या परिस्थितीत शक्य झाले असते का? परंतु हे काहीही समजून न घेता केवळ आपल्या राजकीय फायद्याखातर भारतीय हवाई कारवाईबाबत अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचे दुष्कृत्य आपल्या काही राजकीय नेत्यांनी केले. त्यातून त्यांनीच खरे तर देशाचा विश्वास गमावला. आपल्या चुकीच्या धोरणांनी ज्यांनी पाकिस्तान निर्माण केला, त्याचे हल्ले भ्याडपणे सतत सोसत राहण्यात ज्यांनी धन्यता मानली, त्यांच्या वारसांच्या पचनी भारताचे हे बदलते आक्रमक रूप पडणे शक्यच नव्हते. परंतु किमान गप्प तरी राहायचे! पण सर्जिकल स्ट्राईकनंतर आपल्या सैन्यदलांविषयी, बालाकोट हवाई हल्ल्यानंतर आपल्या हवाई दलाविषयी अविश्वास व्यक्त करून या मंडळींनी देशाशीच जणू प्रतारणा केली. याचा धडा त्यानंतरच्या निवडणुकांत मतदारांनी त्यांना दिला असला तरी देखील आपल्या चुकांपासून काही शिकण्याची त्यांची तयारी दिसू नये हे दुर्दैव. बालाकोटबाबत आता पाकिस्तानचाच उच्चाधिकारी कबुली देतो आहे, पाकिस्तानने त्या हल्ल्यानंतर सारवासारव केल्याचे सांगतो आहे, त्यावरही ही मंडळी प्रश्न उपस्थित करणार आहे काय?