बालगुन्हेगारीचे आव्हान

0
221
  • ऍड. प्रदीप उमप

पूर्वीच्या काळात परिस्थितीने हतबल झालेली आणि सामाजिक अन्यायाला बळी पडलेली मुले गुन्हेगारीकडे वळत, आता मात्र गुंडांकडून लहान मुलांना गुन्ह्यांसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. गेल्या काही महिन्यात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगार सहभागी असल्याचे निदर्शनास आले आहे. बालगुन्हेगारीविषयक कायद्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

‘जाव, उस आदमी का साइन ले के आओ’ हा संवाद तुम्हाला कोठेतरी ऐकल्यासारखा वाटत असेल ना? हा संवाद इथे सांगण्याचे काय औचित्य असा प्रश्‍न पडला असेल ना? हा संवाद अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध ‘दीवार’ चित्रपटातील आहे आणि दुसर्‍या प्रश्‍नाचे उत्तर म्हणजे बालगुन्हेगारीचे वाढते प्रमाण.
एकीकडे गुन्हे करत लहानाचा मोठा झालेला ‘डॉन’ अमिताभ आणि दुसरीकडे कठोर मेहनत घेऊन पोलिस अधिकारी बनलेला शशी कपूर यांच्यात जेव्हा पाप पुण्यावरून संघर्ष होतो, तेव्हा अमिताभ हा लहानपणी लोकांनी दिलेल्या त्रासाचे कथन करतो. सांगायचे तात्पर्य एवढेच की, पूर्वीच्या काळात परिस्थितीने हतबल झालेली आणि सामाजिक अन्यायाला बळी पडलेले मुले गुन्हेगारीकडे वळत, आता मात्र गुंडांकडून लहान मुलांना गुन्ह्यांसाठी प्रशिक्षण दिले जात आहे.

राजधानी दिल्लीत काही महिन्यात घडलेल्या घटनांत अल्पवयीन गुन्हेगार सहभागी असल्याचे निदर्शनास आले आहे. एवढेच नाही तर २०१२ च्या निर्भयाकांडातील पाच आरोपीपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. सद्यस्थितीत अल्पवयीन किंवा किशोरवयीन मुलांकडून वाढत्या अपराधाबाबत सर्वच स्तरावर चर्चा सुरू आहे. लहान वयातच मुलांकडून होणारे गुन्हे कसे रोखता येईल यासाठी विचारमंथन सुरू आहे. कारण एखाद्या लहान मुलाकडून होणारा गुन्हा हा वयस्कर लोकांनी केलेल्या गुन्ह्याप्रमाणे नसतो. त्यामुळे अल्पवयीन मुलांना शिक्षा होत नाही आणि त्यांना बालसुधारगृहात पाठविले जाते. यामागचा उद्देश म्हणजे भविष्यात त्याच्याकडून गुन्हा होणार नाही. खिसा कापणे, मारामारी, मोबाईल किंवा दुकानातून वस्तू चोरणे, यासारख्या गुन्ह्यात लहान मुले अडकले जातात. परंतु आता हीच मुले गंभीर गुन्ह्याकडे वळू लागली आहेत. परंतु प्रत्येकवेळी लहान मुलाकडून घडणारा गुन्हा हा जाणीवपूर्वकच असतो असे नाही.

आपल्याकडे अल्पवयीन आणि किशोरवयीन मुलांकडून होणार्‍या गुन्ह्याबाबत कायद्यात स्पष्टतेचा अभाव आहे. लहान मुलांना योग्य दिशा दाखवणे आणि त्यांचे बालपण हिरावले जावू नये यात संतुलन राखताना न्यायव्यवस्थेत संघर्ष दिसून येतो. अशा कायद्यात बदल कसा करता येईल, याबाबत नव्याने विचार करायला हवा.बहुतांश गुंड लोक हे लहान मुलांना हाताशी धरून त्यांच्याकडून गुन्हे घडवून आणतात. अंमली पदार्थाची देवाणघेवाण करण्याचे काम लहान मुलांना दिले जाते. वास्तविक आपण कोणती गोष्ट नेत आहोत, याचा थांगपत्ता मुलांना लागत नाही. केवळ काही पैशापोटी एक पार्सल एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी न्यायचे आहे, एवढेच काम त्यांना माहित असते. अलिकडच्या काळात अशा प्रकारचे बरेच गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. यासाठी गुंड लोक मुलांना प्रशिक्षण देत आहेत. यावेळी गुंडांकडून लहान मुलांना त्यांचे शत्रू किंवा अटकेपासून बचाव करण्याची हमी दिली जाते. या आधारावर त्यांना गुन्ह्यासाठी तयार केले जाते. परंतु कालांतराने त्यांची ङ्गसगत झाल्याचे निदर्शनास येते. तोपर्यंत उमेदीचा काळ निघून गेलेला असतो.

गेल्या वर्षी मे महिन्यात दिल्लीत टिकटॉक स्टार मोहित मोरे आणि जून महिन्यात मपश्‍चिम विहारचे प्रॉपर्टी डीलर अमित कोचर यांच्या हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला होता. लहान मुलांकडून अशा प्रकारच्या घटना घडवून आणणे ही बाब नवीन नाही. याउलट बालगुन्हेगारीतील उणिवांचा गैरङ्गायदा घेण्यासाठी मोठे गुंड लहान मुलांना कामाला लावत आहेत. दिल्लीतील गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा समावेश हा अधिक असल्याचे उघड झाले आहे. गेल्या दोन वर्षात पाच हजारांहून अधिक बालगुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तर ऑक्टोबर २०१९ पर्यंत दिल्ली पोलिसांनी २०५० बालगुन्हेगारांना पकडले आहे. २०१८ मध्ये हीच संख्या २९३० होती. विशेष म्हणजे बालगुन्हेगारात अशिक्षितांपेक्षा शिक्षित गुन्हेगारांचे प्रमाण लक्षणीय आहे.

हत्या करण्यापासून ते शस्त्रास्त्राची तस्करी करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यात लहान मुले अडकत चालली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये पोलिसांनी एका लहान मुलाला ताब्यात घेतले असता तो मथुराच्या एका टोळीकडून शस्त्र घेऊन ती शस्त्रे दिल्लीत पुरवण्याचे काम करत असत. दिल्ली, रोहिणी तसेच द्वारकासारख्या भागातील गुंडांची त्याची चांगली मैत्री होती. दिल्लीत असे प्रकार आताच वाढले असे नाही तर त्यासाठी दोन दशकाचा इतिहास पाहवा लागेल. दिल्लीत लहान मुलांकडून गुन्हे घडवून आणण्याचे प्रकार २००२ च्या काळात सुरू झाले. कुख्यात गँगस्टर देवाने मुलांना गंभीर गुन्ह्यासाठी प्रशिक्षण देण्यास सुरवात केली होती. कारण त्याला कायद्यातील बारकावे ठाऊक होते. पोलिसांकडून मुलांवर थर्ड डिग्रीचा वापर होत नाही. तसेच घटनेतील तरतुदीनुसार अल्पवयीन मुलांना कठोर शिक्षा होत नाही आणि अधिकाधिक तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. त्यामुळे त्याने लहान मुलांना गुन्हेगारी विश्‍वात ओढण्यास सुरवात केली. गँगस्टर देवाचा ङ्गॉर्म्युला अन्य टोळ्याही वापरू लागल्या.
एकंदरीत बालगुन्हेगारीविषयक कायद्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याशिवाय बालगुन्हेगारीचे प्रमाण का वाढत आहे आणि त्यास कोणते घटक कारणीभूत आहेत, याचाही विचार प्रशासनाने करायला हवा. प्रत्येकवेळी लहान मुलेच गुन्ह्याला जबाबदार असतात असे नाही. पालन पोषण आणि सामाजिक स्थितीमुळे देखील लहान मुले चुकीच्या मार्गावर जावू शकतात. चित्रपटातील नायक हा बदला घेण्यासाठी गुन्हेगारीचे शस्त्र हाती घेत असतो. लहान मुलांसमोर जर असेच चित्रपट येत राहिले तर त्यांच्या मनातही कळत नकळतपणे गुन्हेगारी वृत्ती वाढण्याची शक्यता बळावते. प्रत्यक्ष समाजातील गुंड देखील काहीवेळा त्यांना ‘हीरो’ वाटू लागतात. म्हणूनच बालगुन्हेगारी रोखण्यासाठी प्रशासनाकडून काम केले जात असले तरी प्रत्येक कुटुंबांनी, व्यक्तींनी आपली, परिसरातील लहान मुले चांगल्याच मार्गावर कसे चालतील, यादृष्टीने सजग असणे तितकेच महत्त्वाचे आहे.