बाय बाय जॉन!

0
99

कॉंग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी लुईझिन फालेरोंच्या गळ्यात गोवा प्रदेशाध्यक्षपदाची माळ घालून जॉन फर्नांडिस यांना बाहेरचा रस्ता दाखवला. जॉन यांची गच्छन्ती अटळ होती. फक्त ती केव्हा होणार एवढाच प्रश्न उरला होता. त्यामुळे आजवर दिग्विजयसिंहांच्या आसर्‍याने आपले प्रदेशाध्यक्षपद अढळ आहे अशा भलत्या भ्रमात राहिलेल्या व पक्षाच्या सर्व नेत्यांना निकालात काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या जॉन यांना कॉंग्रेस पक्षाची संस्कृती काय असते, याची आता पुरेशी कल्पना आली असेल. लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पानिपतानंतर आपण स्वतःच प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवली होती असे जॉन आता म्हणत असले, तरी त्यांच्याविरुद्ध वर गेलेल्या तक्रारींमुळेच त्यांची हकालपट्टी झालेली आहे हे उघड आहे. आपल्या हकालपट्टीचे खापर त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर फोडले. पण लुईझिन फालेरोंची निवड खुद्द पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनीच केलेली असल्याने त्यामध्ये पर्रीकरांचा हात आहे असे म्हणणे हास्यास्पद ठरते. विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर विदीर्ण झालेल्या गोवा प्रदेश कॉंग्रेसमध्ये नवी जान फुंकली जाण्याची गरज होती. त्यामुळे जेव्हा जॉन यांच्याकडे पक्षाची सूत्रे आकस्मिकरीत्या सोपवली गेली, तेव्हा पक्षाच्या पुनरुज्जीवनाची जबाबदारीही त्यांच्या शिरावर देण्यात आली होती. परंतु पक्षामध्ये गमावलेला आत्मविश्वास निर्माण करण्याऐवजी त्याचे खच्चीकरणच करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे की काय असे चित्र निर्माण झाले. पक्ष संघटना व विधिमंडळ गट यांच्यामध्ये कमालीची दरी निर्माण झाली. हाती तलवार असली तरी ती एकाच वेळी चोहोबाजूंनी बेफामपणे चालवायची नसते. पण आपल्या हाती श्रेष्ठींनी तलवार सोपवली आहे म्हणजे आता आपण मिळेल त्याला कापून काढू शकतो असे जर कोणाला वाटले तर तो त्याच्या अपरिपक्वतेचा भागच मानावा लागतो. श्रेष्ठींच्या अपेक्षेनुरूप पक्षामध्ये नवे चेहरे आणण्याचा आपला इरादा जॉन यांनी जाहीर केला होता खरा, परंतु नवे चेहरे आणणे म्हणजे सगळेच जुने चेहरे निकालात काढणे नव्हे हे ते विसरले आणि आपल्या व्यक्तिगत राग – लोभांनाही त्यांनी त्या पक्ष स्वच्छता मोहिमेत मिसळले. त्यातूनच पक्षाचे विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांच्याशी त्यांनी पंगा घेतला आणि तेथेच त्यांचे आसन डळमळीत झाले असे म्हणावे लागेल. राणे पिता पुत्रांविरुद्ध लाचखोरीच्या बेफाम तोफा डागण्यासाठी त्यांनी भालचंद्र नाईक या उद्योजकास कॉंग्रेस हाऊसचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले तेव्हा तर हातघाईच्या लढाईस सुरूवात झाली आणि राणेंची आजवरची गोव्यातील राजकीय कारकीर्द, अनुभव, त्यांच्या नावाभोवती असलेले वलय, प्रतिष्ठा या सार्‍याच्या तुलनेत जॉन यांची पक्षनिष्ठा कमी पडली आणि त्यांच्या आसनाला सुरूंग लागला. खरे तर गेल्या ऑगस्टमध्येच जॉन यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार याची पक्की खबर पक्षाच्या स्थानिक ज्येष्ठ नेत्यानेच बाहेर फोडली होती, परंतु जॉन यांचा आत्मविश्वास एवढा दांडगा की, आपल्या पाठीशी पक्षनेतृत्व आहे या भ्रमात राहणेच त्यांनी पसंत केले. त्या भ्रमाचा फुगा आता पुरता फुटला आहे. शेवटी दिल्लीश्वरांना गोव्यासारख्या राज्यातील छोट्या छोट्या कुरबुरींकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. त्यांना हवा असतो तो निवडणुकीतील पक्षाचा विजय. तो मिळवून देणार्‍यांनी त्यासाठी कोणतेही मार्ग अवलंबिले तरी त्याला श्रेष्ठींची हरकत नसते. कार्यकर्त्यांचे बळ, पैसा, प्रतिष्ठा या कोणत्याही बाबतीत जॉन वरचढ नव्हते, त्यामुळे ते जेव्हा पक्षाच्या बड्या बड्या नेत्यांनी आजवर दिलेले योगदान नजरेआड करून त्यांच्यावर द्रोहाचा आरोप करीत सुटले, पक्ष स्वच्छतेच्या मिशाने स्वतःचे जुने हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा त्यांच्या या वागण्याबद्दलची पक्षांतर्गत नाराजी वाढत गेली. जी फुटकळ नवी मंडळी जॉन यांच्या फळकुटाचा आधार घेत पुढे पुढे करीत होती, ती हे फळकूट श्रेष्ठींनी काढून घेतल्याचे कळताच एका रात्रीत उगवत्या सूर्याला दंडवत घालत लुईझिन यांचे गोडवे गाऊ लागली आहेत. ज्या जुन्या मंडळींचा जॉन यांच्या बेफाम वागण्यावर राग होता, तेही लुईझिन यांच्या पाठीशी राहिले आहेत. पण येणार्‍या काळात लुईझिन यांच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटतील तेव्हा कोण कोणाच्या बाजूने असेल ते पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे!!