एफसी गोवाचा उद्या वास्को स्पोर्ट्‌स क्लबशी मित्रत्वाचा सामना

0
140
मुख्य प्रशिक्षक झिको आणि साहाय्यक प्रशिक्षक आथुर पापास यांच्या मार्गदर्शनाखाली फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सराव करताना एफसी गोवाचे खेळाडू. (छाया ः गणादीप शेल्डेकर)

१२ ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या पहिल्या इंडियन सुपर लीग स्पर्धेपूर्वी योग्य सराव मिळावा या उद्येशाने सहभागी सर्व संघ इतर क्लबशी मित्रत्वाचे सामने खेळत आहे. याचाच एक भाग म्हणून एफसी गोवा संघ उद्या गुरुवार दि. ९ रोजी सायं. ७ वा. फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर वास्को स्पोर्ट्‌स क्लबशी विद्युतझोतात मित्रत्वाचा सामना खेळणार आहे. यापूर्वी वास्कोच्या टिळक मैदानावर एफसी गोवाने दोन मित्रत्वाचे सामने खेळलेले आहेत. त्याने त्यांनी सेझा फुटबॉल अकादमीवर ३-० तर भारताच्या अंडर-१९ राष्ट्रीय संघावर ४-० अशी मात करीत आपण या स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.
ब्राझिलचा दिग्गज फुटबॉलपटू तथा तीन वेळा विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेले झिको यांच्या मार्गदर्शनाखाली संघ तयार होत आहे. एफसी गोवाने नुकतेच धेंपोचे विदेशी खेळाडू ऑस्ट्रेलियन टॉल्गे ऑझ्बे आणि अफघाणिस्तानी हारून आमरी यांना पहिल्या आयएसल स्पर्धेसाठी करारबद्ध केले आहे. तसेच सध्या ईस्ट बंगालतर्फे आय-लीग खेळणारा आणि धेंपोचा माजी खेळाडू असलेल्या रँटी मार्टिन्सला एफसी गोवाच्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. तसेच आर्सेनलचा माजी खेळाडू तथा ब्राझिलचा आंतरराष्ट्रीय खेळाडू आंद्रे सांतोसही लवकरच संघासाठी उपलब्ध असणार आहे. संघाने काल फातोर्डा स्टेडियमवर कसून सराव केला. झिको यांनी विदेशी स्टार खेळाडूंबरोबरच येथील स्थानिक हीरो असलेल्या खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्यांच्या हाताखाली सर्व खेळाडू आपले पदलालित्य दाखवायला तयार झालेले असून त्यादृष्टीने ते सरावात घाम गाळत आहेत.