बायणातील ५५ घरांवर २६ रोजी बुलडोझर

0
108

दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी अखेर बायणातील त्या ५५ घरांवर मंगळवार दि. २६ सप्टेंबर रोजी कारवाई करण्याचा आदेश काल जारी केला. या आदेशाची माहिती मिळताच संबंधित घरांतील लोकांनी काल सकाळी मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांच्या बोगदा येथील बंगल्यावर भर पावसात धडक दिली. पण आमदार त्यांना मिळू न शकल्याने सर्व घारमालक हिरमुसले होऊन माघारी परतले.
बायणा समुद्र किनार्‍यावरील खासगी जमिनीवरील ५५ झोपड्यांवर दि. १५ रोजी कारवाई होणार होती. पण या खासगी जमिनीवरील अतिक्रमणे सरकारच्या नवीन कायद्यानुसार नियमित करण्याची मागणी या घरमालकांनी केली होती. त्यानुसार त्यांच्या अर्जांवर निर्णय होईपर्यंत अतिक्रमणे हटवण्यात येऊ नयेत अशी विनंती करण्यात आली होती. या ५५ घरमालकांपैकी २२ जणांनी आपली घरे कायदेशीर करण्यासाठी उपजिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज दाखल केले होते. पण त्या अर्जांवर कोणतीच सुनावणी न झाल्याने या घरमालकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली नव्हती. त्यांना मानवी हक्क व नैसर्गिक न्यायापासून टाळण्यात आल्याने त्यांना बाजू मांडण्यासाठी संधी देण्यात यावी, असे दक्षिण गोवा उपजिल्हाधिकारी आणि कारवाई पथकाचे प्रमुख उदय प्रभूदेसाई यांनी ७ सप्टेंबर रोजी आदेश दिला होता. दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार मुरगाव पालिकेने १५ रोजी होणारी कारवाई स्थगित ठेवली होती. त्यामुळे या घरमालकांना तात्पुरता दिलास मिळाला होता.
दरम्यान, या ५५ मालकांपैकी २२ जणांनी आपली घरे कायदेशिर करण्यासाठी उपजिल्हाधिकार्‍यांकडे केलेल्या अर्जांची सुनावणी झाल्यानंतर हे सर्व अर्ज फेटाळण्यात आले आहेत. पण अर्जदार त्यांचे अर्ज का व कशासाठी फेटाळण्यात आले असा सवाल करीत आहेत. दरम्यान, काल या सर्व घरमालकांनी मुरगांवचे आमदार मिलिंद नाईक यांच्या बंगल्यावर सकाळी धाव घेतली. पण त्यांना ते आपल्या बंगल्यावर मिळू शकले नाही. आज पुन्हा घरमालक आमदारांना भेटण्यास जाणार असल्याचे सांगण्यात आले.