बायंगिणी कचरा प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार ः मडकईकर

0
158

बायंगिणी जुना गोवा येथील नियोजित कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या प्रश्‍नावर स्थानिकांच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेणार आहे, अशी माहिती स्थानिक आमदार पांडुरंग मडकईकर यांनी स्थानिकांनी आयोजित प्रकल्पविरोधी रॅलीत बोलताना दिली आहे.

बायंगिणी जुना गोवा येथे २५० टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास ना हरकत दाखला देण्यात आलेला आहे. या ठिकाणी कचरा प्रकल्प उभारण्यास नागरिकांनी विरोध केला होता. गोवा कचरा व्यवस्थापन मंडळाकडून कचरा प्रकल्पासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. लोकांचा विरोध असताना कचरा प्रकल्पाला मान्यता देण्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थांनी एक रॅली काढून कचरा प्रकल्पाला विरोध असल्याचे घोषित केले आहे. या रॅलीला स्थानिक आमदार मडकईकर यांनी उपस्थिती लावली. आपण लोकांसोबत आहे. कचरा प्रकल्पाच्या प्रश्‍नावर स्थानिक लोकांसमवेत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर कचरा प्रकल्पाचा विषय मांडून या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती करणार आहे, असे मडकईकर यांनी स्पष्ट केले. युनेस्कोने जुना गोवा ही जागतिक हेरिटेज साइट असल्याचे घोषित केले असून तिथे कचरा प्रकल्प उभारणे अयोग्य असल्याचे प्रा. प्रजल साखरदांडे म्हणाले.