>> मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची महापौरांकडून माहिती
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बायंगिणी ओल्ड गोवा येथील नियोजित २५० टीपीडी क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी येत्या १० दिवसांत निविदा जारी करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी काल दिली.
बायंगिणी येथे कचरा प्रकल्प उभारण्यासाठी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाकडून निविदा जारी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. तथापि, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बायंगिणी येथील कचरा प्रकल्पाचे काम स्थगित ठेवण्याची घोषणा कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी केली आहे.
बायंगिणी येथे कचरा प्रकल्प उभारला जात नसल्यास सदर जमीन महापालिकेला परत देण्याची मागणी महापौर उदय मडकईकर यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल एक बैठक घेतली. या बैठकीला कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो, पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर, आयुक्त संजित रॉड्रीग्स व इतर अधिकारी उपस्थित होते.
या ठिकाणी प्रकल्प उभारण्याबाबत नागरिकांची मते जाणून घेतल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने आवश्यक नियमांचे पालन करून प्रकल्प उभारण्यासाठी हिरवा कंदील दिलेला आहे, अशी माहिती महापौर मडकईकर यांनी दिली.