बायंगिणीचा तिढा

0
158

क्षुद्र राजकीय फायद्यासाठी वा आपल्या हितसंबंधांसाठी काही राजकारण्यांकडून राज्याच्या हिताकडे कसा काणाडोळा केला जातो याचे जिवंत उदाहरण म्हणजे बायंगिणीचा कचरा प्रकल्प. गेले जवळजवळ एक तप हा प्रकल्प हितसंबंधियांच्या विरोधामुळे रखडला आहे आणि आताही या प्रकल्पाच्या कार्यवाहीत खो घालण्याचे प्रयत्न चालले आहेत. या प्रकल्पाचे घोडे असे रखडलेले असताना त्यानंतर साळगावात दिमाखदार कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा राहिला देखील आणि आता काकोडा येथेही दक्षिण गोव्यासाठी दुसरा प्रकल्प उभा राहणार आहे. बायंगिणीचे घोडे मात्र गंगेत न्हायला तयार नाही. साळगाव आणि काकोड्यातील कचरा प्रक्रिया प्रकल्प हे राज्य सरकारचे प्रकल्प आहेत, तर बायंगिणीचा प्रकल्प हा पणजी महानगरपालिकेचा प्रकल्प आहे हेही या विलंबाचे एक कारण ठरले आहे. पणजी महानगरपालिकेने या प्रकल्पासाठी जमीन संपादित केली २००८ साली. वास्तविक महानगरपालिकेने आपल्याच कार्यक्षेत्रातील जमीन या प्रकल्पासाठी संपादित करणे अधिक सयुक्तिक ठरले असते, परंतु त्यांनी थेट आपल्या हद्दीपलीकडील बायंगिणी गाठली. या हालचाली सुरू होत्या तेव्हाच कुडकातील तत्कालीन कचरा विल्हेवाट स्थळातील गलथानपणामुळे तेथे प्रदूषणाची गंभीर समस्या उद्भवली आणि बायंगिणीत प्रस्तावित प्रकल्पाला विरोध सुरू झाला. या विरोधामागे दुसरेही एक कारण होते, ते होते स्थानिक बिल्डर लॉबीचे. कदंब पठारावरील जमिनीवर या मंडळींचा डोळा होता आणि जुने गोवे पंचायतीला हाताशी धरून या पठारावर बांधकामांचा सुळसुळाट सुरू झाला. एकेकाळी ज्या पठारावर केवळ वीज उपकेंद्राखेरीज काहीही नव्हते आणि त्या निर्जनस्थळी दिवसाढवळ्या खून पडायचे, तेथे बघता बघता भूखंड पाडले गेले. अगदी कदंब राजवटीच्या भग्नावशेषांवरही भ्रष्ट राजकारण्यांच्या वरदहस्ताने हे भूखंड पाडले गेलेले आहेत, पण ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा सारा प्रकार आहे. त्या भूखंडांवर बडे बडे प्रकल्प आले आणि अजूनही येत आहेत. रायबंदरमार्गे फोंड्याकडे जाणार्‍या जुन्या रस्त्यावरील वाहतूक कदंब बायपासने जाऊ लागली आणि कदंब पठाराला सोन्याचा भाव आला. जुने गोवे पंचायतीने बायंगिणी कचरा प्रकल्पाच्या परिसरामध्ये बांधकाम परवान्यांचा सपाटा लावला. त्यामुळे या प्रस्तावित जागेभोवती हितसंबंध निर्माण झाले आणि आज हेच घटक या प्रकल्पाला कडाडून विरोध करीत आहेत. किमान राजकीय पक्षांनी या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन जनहितार्थ त्याला पाठिंबा दर्शविणे अपेक्षित होते, परंतु येथे तर कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर स्वतःच जुने गोवे पंचायतीतील जनसुनावणीमध्ये प्रकल्पाच्या विरोधात शड्डू ठोकून उभे दिसले. मूळ प्रकल्प केंद्रातील यूपीए सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेखाली साकारणार होता हेही ते विसरले. कचरा ही गोव्याची मूलभूत समस्या आहे आणि कचरा प्रक्रिया प्रकल्प ही गोव्याची मूलभूत गरज आहे. असे असताना क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी जेव्हा अशा प्रकल्पाला विरोध केला जातो तेव्हा त्याला काय म्हणावे असा प्रश्न पडतो. बायंगिणीच्या आजूबाजूला जी वस्ती वाढली, त्याला खरे तर जुने गोवे पंचायतच जबाबदार ठरते. प्रस्तावित कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा परिसर ही जमीन संपादित केली गेली तेव्हा निर्जन होता. तेथे वस्ती वाढली याला जबाबदार कोण? आता त्या पठारावर मठापासून मॉलपर्यंत सारे काही डेरेदाखल झालेले आहे आणि या प्रकल्पाला त्यांची आडकाठी आहे. अशा गोष्टींना वाव दिला कोणी? राजकारण्यांनीच ना? या प्रकल्पासंबंधी आम जनतेच्या मनामध्ये ज्या शंका आहेत, जे गैरसमज आहेत, ते दूर करण्याचा कचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री या नात्याने सध्या मायकल लोबो प्रयत्न करीत आहेत. या प्रकल्पापासून दुर्गंधी येणार नाही, परिसरात अस्वच्छता निर्माण होणार नाही, तो बंद ठिकाणी असेल आदी बाबी त्यांनी स्पष्ट करण्याचा परोपरीने प्रयत्न केला, परंतु ज्यांना ऐकूनच घ्यायचे नसेल त्यांचे काय करायचे? आम जनतेच्या मनामध्ये भीती असणे चुकीचे म्हणता येत नाही, कारण कुडकाचे, सोनसडोचे उदाहरण तिच्यापुढे आहे. तिच्या मनातील भीतीचे निराकरण करण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे हेही खरे आहे, परंतु या जनतेच्या आडून जे हितसंबंधी लोक या प्रकल्पाच्या विरोधात फुरफुरत आहेत, त्यांना उघडे पाडण्याची वेळही आलेली आहे. जुने गोवे पंचायत म्हणे या प्रकल्पाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार आहे. वास्तविक, गोव्याची कचर्‍याची समस्या लक्षात घेऊन उच्च न्यायालयानेच सरकारला २०१३ साली कचरा प्रक्रिया प्रकल्प ताबडतोब उभारायला घ्या असे आदेश दिलेले होते. कचरा प्रक्रिया ही आज अत्यावश्यक गोष्ट बनलेली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ‘वारसा क्षेत्र’ म्हणवणार्‍या जुने गोवे पंचायतक्षेत्रामध्ये जो टनांवारी कचरा आज निर्माण होतो, त्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था पंचायतीपाशी नाही. तिलाही या प्रकल्पाचा फायदा मिळाला असता, परंतु तुलाही नको, मलाही नको असाच सारा प्रकार दिसतो!