बाबुश समर्थक नगरसेवकांमुळे टोंका कचरा प्रकल्प अधांतरी

0
121

>> भाजपच्या नगरसेवकांचा आरोप

पणजी महापालिकेतील सत्ताधारी बाबुश मोन्सेर्रात यांचे पॅनल व भाजप नगरसेवकांचे पॅनल यांच्यात एकमत होऊ न शकल्याने टोंका येथे ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठीच्या १० टन प्रकल्पाची स्थिती त्रिशंकू बनलेली असतानाच काल भाजप पॅनलचे नगरसेवक मिनीन डिक्रुझ, शुभम चोडणकर व वैदेही नाईक यांनी बाबुश पॅनलचे काही नगरसेवक विनाकारण या प्रकल्पाला खो घालीत असल्याचा आरोप काल भाजप मुख्यालयातत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. महापौर उदय मडकईकर व माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो हेही या प्रकल्पाला विरोध करीत असल्याचे पाहून आश्‍चर्य वाटत असल्याचे डिक्रुझ म्हणाले.

टोंक येथे प्रकल्प उभारल्यास महापालिकेचे ट्रक तेथे मोठ्या संख्येने कचरा घेऊन येतील व तेथे दुर्गंधी पसरेल, अशी भीती विरोध करणारे नगरसेवक व्यक्त करीत आहेत. तेथे महापालिकेच्या कचरावाहू ट्रकांची रांग लागेल ही त्यांची भीतीही अनाठाई असल्याचे डिक्रुझ म्हणाले.

साळगाव येथील कचरा प्रकल्प हा उत्तर गोव्यातील किनारपट्टी व पंचायत क्षेत्रातील कचर्‍यासाठी आहे. राष्ट्रीय हरित लवादाने तसा निकाल दिलेला आहे. पणजीचे माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांनी हस्तक्षेप केल्याने पणजीतील १० टन कचरा रोज तेथे नेण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून कचरा घेणे बंद करण्यात आले आहे.ह्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी टोंक येथे १५०० चौ. मी. जमिनीवर ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठीचा प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली होती.