बांबोळीत आजपासूनच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत अंतराळ सुरक्षा, सुनामीवर चर्चा

0
129
पत्रकार परिषदेत परिषदेविषयी माहिती देताना डी. बी. शेकतकर. बाजूस मान्यवर.

पणजी (प्रतिनिधी)
जनरल फोरम फॉर इंटरग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी (एफआयएनएस) ने आज दि. २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान बांबोळी येथे तारांकित हॉटेलमध्ये आयोजित सागर २.० या दुसर्‍या आंतरराष्ट्रीय परिषदेत बाह्य अंतराळ सुरक्षेवर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष लेफ्ट. जनरल डी. बी. शेकतकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.
या परिषदेचे उद्घाटन २३ रोजी संध्याकाळी ५ वाजता उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या परिषदेमध्ये १५ देशातील शंभर प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या परिषदेसाठी इस्त्रो, संरक्षण मंत्रालय आणि गोवा सरकार यांचे सहकार्य लाभत आहे. या परिषदेला इस्त्रोचे तीन माजी अध्यक्ष उपस्थितीत राहणार राहून मार्गदर्शन करणार आहेत, असेही शेकतकर यांनी सांगितले.
सैन्य दलाचे गोव्याचे
महत्त्व वाढणार
संस्थेतर्फे गतवर्षी सागर सुरक्षेवर परिषद घेण्यात आली होती. गोव्यात तरुणांना शिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम सुरू केला पाहिजे. गोवा हा सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. आगामी काळात सैन्य दलाचे गोव्याचे महत्त्व वाढणार आहे. भारताचे उपग्रह, क्षेपणास्त्रे आदी दक्षिण भारतातून सोडण्यात येतात. त्यामुळे अनेकांची नजर गोव्यावर खिळून आहे. त्यामुळे यंदा अवकाश सुरक्षेबाबत परिषद घेण्याचे ठरविले आहे.
गोव्यात एका संस्थेची स्थापना करून सुनामी, समुद्री वारे, हवामान बदल आदींचे शिक्षण देणारे अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज आहे. या संस्थेच्या माध्यमातून डिप्लोमा, पदवी पर्यतचे शिक्षण देण्याची सोय होण्याची गरज आहे. विज्ञानाचा वापर मानव जातीच्या कल्याणासाठी केला पाहिजे. या परिषदेतील चर्चेच्या निष्कर्षाचा अहवाल केंद्रीय मंत्रालयाला सादर केला जाणार आहे, असेही शेकतकर यांनी सांगितले.
या परिषदेमध्ये डॉ. के. राधाकृष्णन, डॉ. किरण कुमार, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. एस. राकेश उपस्थित राहणार आहेत. परिषदेत अवकाश कूटनीती आणि प्रादेशिक सहकार्य, अवकाश व्यवस्थापन, भारतीय अवकाश नीती, आंतरराष्ट्रीय अवकाश सहकार्य, अवकाश आणि वाणिज्य व इतर विषयावर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे सेंक्रेटरी जनरल बाळ देसाई यांनी दिली.