बांद्यानजीक काजू कारखान्याला आग : पावणेदोन कोटींचे नुकसान

0
107

दोडामार्ग येथून जवळ असलेल्या पडवे माजगाव येथील सह्याद्री काजू प्रक्रिया व मद्यार्क निर्मिती कारखान्याला रविवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत सुमारे ५५ क्विंटल काजू बीयांसह प्रक्रिया करून ठेवलेले काजूगर या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यामुळे पावणे दो कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच सावंतवाडी व कुडाळ येथून पाण्याचे बंब मागवून ही आग आटोक्यात आणली. आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही. बांदा पोलिसानी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

कोलझर येथील चंद्रशेखर देसाई चेअरमन असलेल्या सह्याद्री काजू प्रक्रीया मध्यवर्ती कारखाना गेल्या काही वर्षांपासून पडवे-माजगांव येथे सुरु असून तालुक्यातील अनेक महिलांना या काजू कारखान्याच्या माध्यमातून रोजगारही मिळाला होता. गेल्या हंगामात मोठ्या प्रमाणात देसाई यांनी काजू बी खरेदी करून या गोदामांत ठेवल्या होत्या. तसेच काजू प्रक्रीया केलेले काजूगर तसेच इतर साहित्यही या गोदाममध्ये ठेवले होते.
रविवारी सायंकाळी सदर कारखाना बंद करून कामगार व देसाई घरी गेले होते. रविवारी मध्यरात्री या गोडावूनला आग लागली. सोमवारी सकाळी काही ग्रामस्थ या रस्त्याने जात असल्याने त्यांना काजू कारखान्यामधील गोडाऊनमधून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे निदर्शनास येताच दूरध्वनी करून याची कल्पना चंद्रशेखर देसाई यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गोडावूनचे शटर, खिडक्या बंद होत्या व आतून धूराचे व आगीचे लोळ बाहेर पडत होते. जवळपास पाण्याची कुठलीही सोय नसल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले नाही.