बलुचींतील फूट

0
213

पाकिस्तानकडून गिलगिट बलुचिस्तानमधील नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले जात असले, तरी या बलुची स्वातंत्र्ययोद्ध्यांमधील अंतर्गत मतभेद जोवर मिटणार नाहीत, तोवर पाकिस्तानची नांगी ठेचणे त्यांना शक्य होणार नाही असे दिसते. काश्मीरमध्ये नाक खुपसणार्‍या पाकिस्तानला अद्दल घडविण्यासाठी मध्यंतरी भारताने बलुचिस्तानचा विषय ऐरणीवर आणला. तेथील मानवाधिकारांच्या हननाची दृश्ये जगासमोर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या आपल्या भाषणात बलुचींचा उल्लेख केल्यापासून पाकिस्तान अधिक सजग झाले आहे आणि अधिकाधिक अमानुषतेने बलुची आंदोलन चिरडून टाकण्यामागे लागले आहे. ब्रह्मदाग बुगतीने भारतात राजाश्रय मागितला तेव्हापासून पाकिस्तानी लष्कर बलुची आंदोलकांना नेस्तनाबूत करण्यामागे लागले आहे आणि विदेशांत शिक्षण घेणार्‍या बलुची स्वातंत्र्ययोद्ध्यांचे प्राणही आयएसआयच्या धोक्यामुळे संकटात आले आहेत. तिबेटमध्ये चीनने आक्रमण करताच दलाई लामांनी जसा भारतात आश्रय मागितला आणि धर्मशालेमध्ये त्यांना आसरा देण्यात आला, तशाच प्रकारे बलुची नेत्यांनाही भारतात आश्रय मिळावा आणि त्यांना येथून जगाचे लक्ष आपल्या प्रश्नाकडे वेधता यावे असा प्रयत्न बुगती आणि त्याच्या साथीदारांचा राहिला आहे. परंतु या सगळ्यात एक मोठी अडचण आहे ती म्हणजे या बलुची स्वातंत्र्ययोद्ध्यांमध्ये एकजूट नाही. बलूच रिपब्लिकन पार्टी, नीला कादरी बलुच यांच्या नेतृत्वाखालील गट, इतर बलुची संघटना या सार्‍यांमध्ये तीव्र मतभेद आहेत. ब्रह्मदाग बुगती हा यातील बलूच रिपब्लिकन पार्टीचा नेता. तो सध्या जिनिव्हातून या चळवळीची सूत्रे हलवतो. परंतु नीला कादरी बलुचच्या भारताशी हातमिळवणीच्या प्रयत्नांमुळे तो नाराज झाला आहे. त्याने अलीकडेच सोशल मीडीयावरून आपली नापसंती व्यक्तही केली. अर्थात, बलूच आंदोलकांना आपला प्रश्न सुटलेला हवा असेल, पाकिस्तानकडून चाललेल्या अमानुष अत्याचारांना पायबंद घालायचा असेल, तर आपसातील सर्व मतभेद गाडून एकत्र येणे त्यांच्यासाठी अत्यावश्यक आहे. भारताची विद्यमान विदेश नीती पाहता बलुचींना साथ निश्‍चितच मिळेल, परंतु त्यासाठी त्यांनी आपसातील मतभेदांना मूठमाती देऊन एकत्र आघाडी उभी करणे आवश्यक असेल. भारतीय स्वातंत्र्यसमरामध्येही सगळे काही एकाच विचारसरणीचे नव्हते. जहाल होते, मवाळ होते, क्रांतिकारी होते, गांधीवादी होते, सावरकरवादी होते, नेताजी सुभाषवादी होते, परंतु स्वातंत्र्याच्या व्यापक उद्दिष्टप्राप्तीसाठी सगळे वावरले. बलुची नेत्यांनी याचे स्मरण ठेवणे आजच्या घडीस गरजेचे आहे. त्यांना हवी असलेली सगळी राजनैतिक मदत भारत सरकार त्यांना पुरवू शकते, परंतु सध्याच्या मतभेदांच्या वावटळीत जर भारताने हस्तक्षेप केला, तर ते आपल्याच पायावर धोंडा मारून घेतल्यासारखे ठरण्याची भीती आहे. बलुची नेत्यांमध्ये जो संघर्ष उफाळलेला दिसतो, तो स्वातंत्र्यचळवळीचे नेतृत्व आपल्या हाती ठेवण्यावरून आहे, कारण आज आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष त्या प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले आहे. डॉ. कादरी यांनी भारतात हातमिळवणीचे केलेले प्रयत्न ब्रह्मदाग बुगतीला पसंत नाहीत. इतरांशी सल्लामसलत न करता आणि विविध बलूच गटांत एकवाक्यता निर्माण न करताच त्यांनी भारताशी संधान बांधले असे ब्रह्मदाग बुगतीचे म्हणणे दिसते. हे असे मतभेद कायम राहणार असतील तर त्यांना खतपाणी घालून फूट पाडण्याचे कारस्थान आयएसआय केल्यावाचून राहणार नाही. पाकिस्तानला तर हेच हवे आहे. याचा विचार समस्त बलुची आंदोलकांनी करण्याची आणि आपसातील मतभेदांना मिटवून एका व्यापक उद्दिष्टासाठी एकत्र येण्याची आजच्या घडीस आवश्यकता आहे.