बांगलादेशी सैनिकांचा गोळीबार, बीएसएफचा एक जवान शहीद

0
212

बांगलादेशी सैनिकांनी भारत-बांग्लादेश सीमेवर केलेल्या गोळीबारात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला. यात आणखी एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. बांगलादेशने डांबून ठेवलेल्या भारतीय मच्छीमारांचा सीमेवर बीएसएफचे जवान शोध घेत असताना हा गोळीबार करण्यात आला. काल गुरूवारी भारत-बांगलादेश सीमेवर तीन मच्छीमार पद्मा नदीवर मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यातील दोघेजण परत आले. त्यांनीच आपल्या तिघांना बांगलादेशच्या पोलिसांनी अटक केल्याचे सांगून त्यातील दोघांची सुटका केल्याचे सांगितले. तर एक मच्छीमार अजून बांगलादेशच्या ताब्यात असल्याचे ते म्हणाले. त्यांचा शोध चालू असताना हा गोळीबार झाला.

मुर्शिदाबाद जिल्ह्यातील काकमारिचार सीमा पोस्टवर हा प्रकार काल गुरूवारी सकाळी नऊच्या सुमारास घडला. बीएसएफच्या जवानांचा कमांडर हा मुद्दा सोडवण्यासाठी एका बोटीतून सहा सहकार्‍यांसह सीमेवर गेला होता. त्यावेळी बांगलादेशच्या सैनिकांनी तिसर्‍या मच्छीमाराला तर सोडले नाहीच, याउलट भारतीय जवानांना घेरण्याचा प्रयत्न करत गोळीबार केला. यात सीमा सुरक्षा दलाचे विजय भानसिंग हे मुख्य हवालदार जागीच शहीद झाले. तर राजवीर यादव हे हाताला गोळी लागून जखमीं झाले. त्यांना भारतीय हद्दीत यशस्वीपणे आणण्यात आले.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख व्ही. के. जोहरी यांनी बीजीबीचे प्रमुख मेजर जनरल शफिनुल इस्लाम यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, २०१५ नंतर भारत-बांगलादेश सीमेवर पहिल्यांदाच गोळीबाराची घटना घडली आहे. २७ डिसेंबर २०१५मध्ये भारत-बांगलादेश सीमेवर दोराबादरी येथे बांगलादेशी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता. कुपेन्द्र बर्मन असे या शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे.