- डॉ. मनाली महेश पवार
कालपर्यंत शेवगा हा भाजीपुरतीच मर्यादित होता; आज बरेचजण औषधीरूपात त्याचा उपयोग करतात. पण हा शेवगा औषध म्हणून सेवन करताना त्याचे गुणधर्म माहीत असणे गरजेचे आहे. कोणत्या प्रकृतीसाठी शेवगा उपयुक्त आहे हे पहिल्यांदा जाणून घ्यावे. सरसकट सगळ्यांनीच शेवगा सेवन करू नये.
मी सकाळी मोरिंगा पावडर घेते/घेतो. त्याने लठ्ठपणा कमी होतो, शुगर कमी होते, हृदयाला चांगली, अशी अनेक वक्तव्ये सध्या ऐकायला मिळतात. मोरिंगा म्हणजे शेवगा हो!
शेवग्याची भाजी कृष्णजन्माष्टमीला खायची कोकण प्रांतात एक प्रथा आहे. या दिवशी शेवग्याची कोवळी पाने काढून त्याची भाजी उपवास करणारे व इतरही खातात. या दिवसांत पचनशक्ती मंदावलेली असते. व्रत-वैकल्ये असल्याने गोडधोड खाण्यात येते जे पचायला जड होऊ शकते. शेवग्याच्या पानांची भाजी शरीर डेटॉक्स करते व पचनशक्ती सुधारण्यास मदत करते म्हणून ही शेवग्याच्या पानांची भाजी खायची प्रथा रूढ झाली असावी. तसेच आधुनिक शास्त्राप्रमाणे विचार करता, शेवग्यामध्ये प्रचुर मात्रेत जीवनसत्त्व- सी, कॅल्शियम, फॉस्फरस आढळते. उपवासामुळे अशक्तपणा येऊ नये हेदेखील कारण असू शकते.
शेवग्याच्या शेंगा डाळीत, आमटीत घालून खाल्ल्या जातात. शेवगा हा भाजीपुरतीच कालपर्यंत मर्यादित होता; आज बरेचजण औषधीरूपात त्याचा उपयोग करतात. पण हा शेवगा औषध म्हणून सेवन करताना त्याचे गुणधर्म माहीत असणे गरजेचे आहे. कोणत्या प्रकृतीसाठी शेवगा उपयुक्त आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. सरसकट सगळ्यांनीच शेवगा सेवन करू नये.
शेवग्याचे गुणधर्म व उपयुक्तता
शेवग्याला संस्कृतमध्ये शिग्रू म्हटले आहे. शोभिवंत असा वृक्ष म्हणून शोभंजन. आज ड्रमस्टिक, मोरिंगा म्हटले की सगळ्यांना समजते.
स्वरूप : 78 मीटर उंचीचे वृक्ष. साल व काष्ठ मृदू असतात. पाने संयुक्त, पक्षाकार, 20 ते 40 सेंटीमीटर लांब, सहा ते नऊ पत्रके अभिमुख. पंधरा ते पंचेचाळीस सेंटीमीटर लांब, दुर्घट हिरवे, सहा शिरांनी युक्त अशा शेंगा. बीज त्रिकोणी पांढरे पंख असलेले कडू. जानेवारी ते मार्च महिन्यांत फुले व एप्रिल ते जून महिन्यात फळे येतात.
शेवगा किंचित मधुर, काहीसा कडू व काहीसा तिखट असतो. विपाक कटू व वीर्य उष्ण असते. गुणांनी लघु, रुक्ष, तीक्ष्ण व सर.
मधुर शहारीय कटूरसात्मक उष्ण व तीक्ष्ण असलेला शेवगा विद्रधी पाचन व शोथहर असल्याने पानांचा लेप करून व पोटात देण्यासाठी त्यांचा विद्रधीच्या सर्व अवस्थांमध्ये वापर करावा. तसेच तो दीपन, पाचन व कृमिघ्न असल्याने जीर्ण अग्निमंद, अरूची व कृमीमध्ये त्याच्या शेंगांची किंवा पानांची भाजी नेहमी खाण्यात ठेवावी. बीजचूर्ण कफज, शिर शुलात, प्रधमन, नास्यासाठी वापरावे.
- तिक्त, कटूरस, कटू विपाक, उष्ण, तीक्ष्ण व क्षारीय गुणांमुळे शिग्रू अमाशयात साठलेल्या कफाचा नाश करतो. त्यामुळे तो अग्निमंद दूर करून अग्नीचे दीपन करतो. आशयातील पाचक पित्ताची वृद्धी करतो. अग्निदीपनासाठी शेवग्याच्या पानांची किंवा शेंगांची भाजी नेहमी खाण्यात ठेवावी.
- तिक्त कटू रसात्मक शेवगा जिभेच्या ठिकाणी प्रकुपित झालेल्या कफाचा नाश करून जिव्हा शोधन करतो. जिव्हा शोधन झाल्याने अरूची नष्ट होते. अन्नाला रूची येते. कटू रास व उष्ण वीर्य असल्याने कृमींचा नाश होतो.
- पकवाशयातील क्लेदाचे शोषण करतो, त्यामुळे मलाला बद्धता येते. यामुळे शेवगा हा अपचन, अरूची, पोटात दुखणे, गुल्म, उदररोग, कृमीमध्ये उपयुक्त आहे.
- शेवगा अग्निबल वाढवतो, संचित दोषांचे पचन करून स्रोतोरोध दूर करतो. त्यामुळे सूज असता शेवग्याचा वापर करावा.
- कफ कमी करणारा असल्याने खोकल्यात उपयुक्त ठरतो.
- शेवग्याच्या बियांच्या चूर्णाचे नस्य केल्याने कफ शोधन होऊन डोकेदुखी, डोके जड होणे ही लक्षणे दूर होतात. चक्कर आल्यास मनुष्य शुद्धीवर येतो.
- उष्ण असल्याने हृदय उत्तेजक, हृदयाला बळ मिळते.
- उष्ण व तीक्ष्ण असल्याने मेदाचे पचन व शोषण होऊन लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
- बाह्य आणि अभ्यंतर विद्रधी व शोथामध्ये शेवगा अत्यंत उपयुक्त आहे. विद्रधीच्या अमावस्थेत आमाचे पचन होते व विद्रधी (फोड, अब्सेस) विकोपाला जात नाही. फोड पिकल्यावर त्यातून पू बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे विद्राधीच्या सगळ्या अवस्थेत शिग्रू उपयुक आहे.
उपाय
- आतील भागातील गाठीमध्ये शेवग्याचा काढा पोटातून द्यावा आणि लेपासाठी मुळाची चटणी वापरावी.
- गंडमाळेत शिग्रू क्वाथ व तूप हे मिश्रण द्यावे.
- पित्तामधील वाढलेली उष्णता स्वेदांवाटे बाहेर पडते. तसेच मेदाचे पचन होऊन मेदाचा मल असलेला स्वेद वाढतो व या दोन्ही कारणांमुळे शेवगा स्वेदजनन कार्य करतो.
- शेवग्याच्या सालीचा काढा पिण्यास द्यावा आणि पानांचे पोटीस करून त्याने किंवा काढ्याने शेकावे.
- बीजचूर्ण अंजन करतात म्हणून नेत्ररोगात उपयुक्त.
- नारूवर शेवग्याची पाने किंवा साल किंवा सैंधव यांचा लेप केला असता नारू बाहेर पडतो.
- उष्ण असल्याने आर्तवजनन आहे, त्यामुळे कष्ट आर्तवात वापर करावा.
- उष्ण, तीक्ष्ण असल्याने सतत शेवग्याचे सेवन करू नये. रक्तपित्ताचा त्रास होऊ शकतो.
म्हणून शेवगा कितीही बहुगुणी असला तरी पित्त प्रकृतीच्या माणसांनी त्याचे जास्त सेवन करू नये. औषधी म्हणून वापरताना वैद्याचा सल्ला नक्की घ्यावा.