बसने धडक दिल्याने वास्कोत वृद्ध जागीच ठार झाला. हा अपघात काल सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. हीरम पवार (८० वर्षे) हा वृद्ध रस्ता ओलांडत असताना जीए-०६-टी-२०३२ जावेद ट्रॅव्हल्स या बसने सदर वृद्धाला जोरदार धडक दिल्याने सदर वृद्ध रस्त्यावर कोसळला व त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. अपघात घडताचक्षणी ठोकर दिलेल्या बसच्या चालकाने तेथून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन बस ताब्यात घेतली. उपनिरीक्षक निखिल पालेकर यांनी मृतदेहाचा पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी मडगाव येथे हॉस्पिसियो इस्पितळात पाठवला.
दरम्यान, हवालदार विजय परेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर वृद्ध विकलांग होता व तो वास्को न्यायालयासमोर मुख्य रस्ता ओलांडत होता. तेवढ्यात अचानक जावेद ट्रॅव्हल्स नामक बसने जोरदार धडक दिली. वास्को पोलिसांनी सदर बस चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला असून लवकरच त्याला अटक करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. बसमालक जावेद याची पोलिसांनी जबानी घेतली असून पुढील तपास वास्कोचे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर, हवालदार विजय परेरा व उपनिरीक्षक निखिल पालेकर करीत आहेत.