24 लोकांचा मृत्यू, 82 जण जखमी
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा येथे काल रविवारी झालेल्या एका आत्मघाती हल्ल्यात 24 लोकांचा मृत्यू झाला असून या घटनेत 82 जण जखमी झाले. हा अपघात रेल्वे रुळाजवळ झाला. जाफर एक्स्पेस ट्रेन ही क्वेट्टा कॅन्टच्या दिशेने जात होती त्यावेळी हा स्फोट झाला. हा स्फोट इतका जोरदार होता की ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरले आणि परिसरात गोंधळ उडाला. स्फोटानंतर रेल्वे रुळाजवळ आग लागली. अग्निशामक दल, पोलीस, बचाव पथक आणि सुरक्षा दल तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले.
स्फोटाच्या प्रभावाने आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या. स्फोटानंतर रेल्वे रुळावरून धुराचे लोट उठले. यावेळी तेथे उभ्या असलेल्या अनेक गाड्यांनाही आग लागली. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसर वेढला आहे आणि स्फोटाचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही, परंतु सुरक्षा यंत्रणा याला दहशतवादी हल्ला मानून तपास करत आहेत.
जाफर एक्सप्रेस लक्ष्य
जाफर एक्सप्रेस ही पाकिस्तान रेल्वेची एक लांब पल्ल्याची प्रमुख प्रवासी ट्रेन आहे. ही ट्रेन बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटाला पाकिस्तानच्या मोठ्या शहरांशी जोडते. ही बलुचिस्तानसह अनेक संवेदनशील भागातून जाते. अलीकडच्या वर्षांत बलुचिस्तानमध्ये रेल्वे रुळ, सुरक्षा दल आणि सरकारी ठिकाणांवर अनेक मोठे हल्ले झाले आहेत. ही ट्रेन ज्या भागातून जाते, तिथे बलूच लिबरेशन आर्मीचे (बीएलए) वर्चस्व आहे, त्यामुळे या ट्रेनला अनेकदा लक्ष्य करण्यात आले आहे. गेल्या वर्षी बीएलएने जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले होते. त्यावेळी 214 प्रवाशांना ओलीस ठेवल्याचा आणि 30 सैनिकांची हत्या केल्याचा दावा केला होता.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी
बलुचिस्तानमधील अनेक लोकांचे असे मत आहे की, भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांना एक स्वतंत्र देश म्हणून राहायचे होते. परंतु त्यांच्या इच्छेशिवाय त्यांना पाकिस्तानात सामील करण्यात आले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही शक्तिशाली संघटना आहे. ही संघटना 70 च्या दशकात अस्तित्वात आली