(क्षणचित्रं… प्राणचित्रं…)
- प्रा. रमेश सप्रे
क्रीडाक्षेत्रातील अतिरथी महारथीसुद्धा या घरबसल्या सहज खेळता येणाऱ्या जुगारांच्या जाहिराती करतात. त्यांना कोण अडवणार? कारण सारेच नुसते बाजारी नव्हे तर बरबटलेले बाजारू बनलेय. प्रत्येकजण व्यापारी आहे नि प्रत्येकजण गिऱ्हाईक आहे. कोण कुणाला सुधारणार?
‘बरबटलेले हात’ म्हटल्यावर दोन गोष्टी प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर येतात. एक- चिखल नि दोन- भ्रष्टाचार.
हा हृदयस्पर्शी प्रसंग दुसऱ्या गोष्टीबद्दलचा आहे, म्हणजे भ्रष्टाचारासंबंधीचा आहे. अभया ही पाचवीतली विद्यार्थिनी. सारेजण ‘चिमुरडी चिन्गारी’ म्हणायचे तिला. कारणही तसेच होते. अभ्यास, क्रीडा, अभिनय, सर्व प्रकारच्या स्पर्धा यांत ती उत्साहाने भाग घ्यायची. सर्वात तिला बक्षिसे मिळत. अनेक स्पर्धांत नि अभ्यासात तर तिचा प्रथम क्रमांक ठरलेला असे.
नेहमीप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन नि पारितोषिक वितरणाचा समारंभ ठरला होता. निमंत्रणपत्रिकाही सर्वांना दिल्या होत्या. अभयाच्या वर्गशिक्षिकेने तिला गमतीने म्हटले, ‘उद्या मोठी टोपली घेऊन ये. सारी बक्षिसं घरी न्यायला सोयीचं होईल!’ बाईंनी सर्वांना उद्देशून सांगितले, ‘मुलांनो, तुमच्या आईवडिलांनी- दोघांनीही- कार्यक्रमाला यायला हवं.’ रात्री जेवताना अभयानं आईबाबांना निश्चित यायला सांगितले. कारण तिला सर्वाधिक बक्षिसे मिळणार होती. बाबांनी विचारले, ‘कुणाच्या हस्ते मिळणार आहेत ही बक्षिसं?’ अभयाने नाव सांगताच बाबा उद्गारले, ‘याला कशाला बोलावलं? याचे हात तर भ्रष्टाचारानं बरबटलेले आहेत. सर्व प्रकारचे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे या व्यक्तीनं केलेयत. याच्या हातून बक्षिसं स्वीकारणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. असू दे. तुझं कौतुक पाहायला आम्ही दोघं अवश्य येऊ.’ तो विषय तिथे संपला.
दुसऱ्या दिवशी बक्षिसांचे वाचन करणाऱ्या शिक्षकांनी म्हटले, ‘आता श्वास रोखून ऐका आपल्या अभयाला किती बक्षिसं मिळाली आहेत ते!’ शिक्षकांना एका श्वासात बक्षिसांची यादी वाचता येणारच नव्हती. सर्वांना कौतुक वाटत असताना अभया व्यासपीठावर आली. पाहुण्यांनी तिला एकदम उचलून घेतले. यादी वाचून झाली. पाहुण्यांनी अभयाला खाली उतरवले. बक्षिसे द्यायला सुरुवात करणार इतक्यात अभया म्हणाली, ‘मला एक मिनिट बोलायचंय.’ तिला माईक दिला गेला. सगळे जिवाचे कान करून ऐकू लागले. अभया ठामपणे म्हणाली, ‘ज्या व्यक्तीचे हात भ्रष्टाचारानं बरबटलेले आहेत, त्यांच्या हातून मी बक्षिसं घेणार नाही!’
सारं सभागृह चिडिचूप. कुणाला काय करावं हे सुचना. व्यासपीठावरील सन्माननीय (?) पाहुणे, शाळेचे व्यवस्थापक, मुख्याध्यापक यांनी शरमेनं माना खाली घातल्या. काही क्षण असेच भीषण शांततेत गेल्यावर सर्व प्रेक्षक उभे राहिले नि टाळ्यांच्या गजरात एका स्वरात म्हणाले, ‘अभयाचा विजय असो!’
तो बक्षीस समारंभ मग आवरता घेतला गेला. दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांत पहिल्या पानावर या घटनेचा तारांकित चौकटीत वृत्तांत दिला गेला. त्याचे मथळे आकर्षक तसेच प्रेरक होते. उदा. ‘मैत्रेयी-मुक्ताईची वारस- अभया’, ‘निर्भय अभयाचे तेजस्वी उद्गार’ इ. इ.
आता हे दुसरे प्राणचित्र पहा. अशाच एका चिरसौदामिनीचे.
मुंबईचे ऑगस्ट क्रांतिमैदान. काही राष्ट्रीय आणि स्थानिक नेते यांच्या हस्ते तेथील स्मारकाला पुष्पहार घातले गेले. समारंभ आटोपला. त्यानंतर काही वेळातच सौदामिनी दुर्गा भागवत आपल्या काही दामिनी सख्यांसह कार्यक्रमस्थळी गेल्या. तो सर्व भाग त्यांनी स्वच्छ केला. नंतर स्मारक साबण इ. वापरून स्वच्छ धुवून पुसले. वार्ताहर जमले, त्यांनी या सर्व प्रकाराचे छायाचित्रण केले. शेवटी दुर्गाताईंची मुलाखत…
वार्ताहर ः तुमच्या या कृतीचा उद्देश काय?
दुर्गा ः उघड आहे. भ्रष्टाचारानं बरबटलेले हात या स्मारकाला लागावेत हे पटतच नाही. 9 ऑगस्ट 1942 च्या त्या महात्मा गांधीजींच्या सभेला मी स्वतः उपस्थित होते. कुठे ते ‘भारत छोडो’ आंदोलनानं मनामनावर कोरून प्रत्यक्ष कृती करण्यास प्रेरणा देणारं देवदुर्लभ दिव्य चित्र! नि कुठे हे काळकुट्ट भ्रष्टाचारानं बरबटलेल्या तथाकथित नेतेमंडळींचं चित्र!
यावर अधिक भाष्य करायची गरजच नाही. असो.
बरबटलेले भ्रष्ट हात नि मनं फक्त राजकीय क्षेत्रातच आहेत असं बिलकुल नाही. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात नि अध्यात्मासारख्या सात्त्विक क्षेत्रातही असे हात आहेतच. क्रीडाक्षेत्रात तर एकही प्रकार असा नाही की जिथं भ्रष्टाचार नाही. हायफाय क्रिकेट-फुटबॉलपासून स्वदेशी कबड्डी-कुस्तीपर्यंत सर्व क्षेत्रे भ्रष्टाचाराच्या ऑक्टोपसी विळख्यात गुदमरताहेत.
खेळांच्या निमित्ताने जो कोट्यवधी रुपयांचा जुगार (बेटिंग) खेळला जातो त्याची जाहिरात प्रसिद्ध क्रीडापटू स्वतःच करतात. जीवनातून उठवणारं आणखी वेगानं फोफावत असलेलं जुगारी क्षेत्र म्हणजे पत्त्यांचा खेळ रमी नि त्याचे विविध प्रकार. प्रसिद्ध खेलरत्न, अर्जुनादी मानसन्मान मिळवणारे क्रीडाक्षेत्रातील अतिरथी महारथीसुद्धा या घरबसल्या सहज खेळता येणाऱ्या जुगारांच्या जाहिराती करतात. त्यांना कोण अडवणार? कारण सारेच नुसते बाजारी नव्हे तर बरबटलेले बाजारू बनलेय. प्रत्येकजण व्यापारी आहे नि प्रत्येकजण गिऱ्हाईक आहे. कोण कुणाला सुधारणार? असो.
काही वर्षांपूर्वी घरातील स्वाभिमानी सदाचारी स्वामिनी (गृहिणी) नवऱ्याला बजावून सांगत होती- ‘कृष्णधवल (ब्लॅक ॲण्ड व्हाइट) टीव्ही चालेल, पण वाटेल ते (धंदे) करून कलर टीव्ही नका आणू.’ हेच ती गृहस्वामिनी इतर चैनीच्या, आरामाच्या गोष्टींबद्दलही सांगत होती. म्हणून भ्रष्टाचार नि बरबटलेले हात खूप कमी होते. आज तीच स्त्री उलट सांगतेय- ‘काहीही करा पण चैनीच्या, सुखोपभोगाच्या महागड्या वस्तू घरात आणा.’
रस्ते उघडले जातात, पूल पडतात, मूत्रपिंडासारखे शरीरातील अवयव चोरले जातात, इतकेच काय पण युद्धातील शूर हुतात्मा जवानांसाठीच्या शवपेटिकाही (ज्या पवित्र राष्ट्रध्वजात लपेटलेल्या असतात) भ्रष्टाचाराच्या बरबटलेल्या हातातून सुटत नाहीत. अगदी कोरोनासारख्या महामारीत जीवनावश्यक औषधांच्या भ्रष्ट व्यवहारानं अनेकांचे हात बरबटलेले होते. असो.
‘प्रेताच्या टाळूवरचं लोणीही खातील’ असं आपल्या भाषेत म्हटलं जातं. पण सध्याची परिस्थिती पाहिली तर प्रेताच्या टाळूपर्यंत लोणी पोचूच देणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. याला काय म्हणायचं? भ्रष्ट कलियुगाची चढती कमान म्हणूया! आणखी काय?