भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका देशाच्या विविध भागांत सध्या सुरू झाला आहे. येत्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते गोव्यातही येतील. ही भाषणे आपण बारकाईने ऐकली तर आपल्या लक्षात येईल की मोदींची भाषा बदलू लागली आहे. अधिक मूलगामी मुद्द्यांना ते स्पर्श करू लागले आहेत. ‘हिंदुत्वाचा तारणहार’ अशी आजवरची स्वतःची प्रतिमा पुढे न करता ‘गोरगरिबांच्या प्रश्नांप्रती जिव्हाळा असलेला नेता’ अशी प्रतिमा घडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न मोदींनी चालवलेला आहे आणि त्यात त्यांना यशही येताना दिसते आहे. अल्पसंख्यकांपुढे आजवर मोदी, मोदी, मोदी करून जो बागुलबोवा नाचवला गेला, तो अकारण होता हे सिद्ध करण्याचा त्यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न दिसतो. त्यांची भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून औपचारिक घोषणा होताच हरियाणामधील रेवाडीत माजी सैनिकांच्या मेळाव्यात त्यांचे जे भाषण झाले तेथपासून परवाच्या कानपूरच्या सभेपर्यंत सर्वत्र मोदी जनसामान्यांच्या रोजच्या जगण्याच्या प्रश्नांना हात घालणारी भाषणे करू लागले आहेत.
गरीबी, बेरोजगारी, महागाई अशा या देशाच्या सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणार्या मूलभूत प्रश्नांवरून कॉंग्रेसला लक्ष्य करण्याचे सत्र त्यांनी चालविले आहे. कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी आजवर ‘आम आदमी’चा जप करीत गोरगरिबांच्या, दीनदलितांच्या झोपड्यांत जाऊन राहून गरीबीचा अनुभव घेण्याची जी स्टंटबाजी केली, तिची मोदी आपल्या सभांमधून खिल्ली उडवतात, सोन्याचा चमचा मुखात घेऊन आलेले शहजादे कॅमेरेवाले घेऊन गरीबी पाहायला गेले होते अशी टर उडवतात, हे भाषणांतून केवळ विनोदनिर्मितीसाठी सांगितले जात नाही. कॉंग्रेसने आजवर जपलेला ‘आम आदमी’चा जप किती पोकळ आहे ते दाखवण्याचा मोदी यांचा प्रयत्न दिसतो. मोदी यांना कॉंग्रेसने आणि इतर तथाकथित सेक्युलर पक्षांनी आजवर खलनायक म्हणून काळ्या रंगात रंगवण्याचा भरपूर प्रयत्न केला. कधी त्यांना ‘मौत का सौदागर’ म्हटले, कधी ‘हिटलर’ ठरवले, तर कधी ‘रॅम्बो’ म्हणून टर उडवली. इंग्रजी प्रसारमाध्यमांनीही २००२ च्या गुजरात दंगलीवरून एक तप त्यांना झोड झोड झोडले. त्याला उत्तर म्हणून भाजपाने गुजरातचे विकासपुरूष अशी त्यांची प्रतिमा पुढे आणण्याचा प्रयत्न केला. गुजरातच्या विकासाच्या यशोगाथा भाजपाने सांगायच्या आणि ते दावे कसे खोटे आहेत हे कॉंग्रेसने उजेडात आणण्यासाठी धडपडायचे असा प्रकार गेला बराच काळ चालला. आता तर निवडणुकांची धामधुम सुरू झालेली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. या निवडणुका मोदींसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. त्यामुळे हिंदुत्वाच्या किंवा राममंदिराच्या मुद्द्याला अलगद बाजूला ठेवून रोजच्या जगण्याशी संबंधित विषयांवरून कॉंग्रेसला झोडपणे आपली स्वीकारार्हता वाढवण्यासाठी अधिक उपयुक्त ठरेल एवढे राजकीय शहाणपण मोदींना नक्कीच आहे. अडवाणींना अपेक्षित असलेेले ध्रुवीकरण होऊ नये यासाठी ते विशेष दक्ष दिसतात. मध्यमवर्ग ही भाजपाची हुकमी मतपेढी. कॉंग्रेस मात्र आजवर आम आदमीच्या मतांच्या आधारे निवडणुका जिंकत आली. आता कॉंग्रेसच्या त्या पारंपरिक मतपेढीला खिंडार पाडण्यासाठी मोदींची शर्थ चालली आहे हे त्यांची अलीकडची भाषणे सांगतात. प्रखर राष्ट्रवाद, स्वच्छ व कार्यक्षम प्रशासन, स्वतः गरिबीतून वर आलेले असल्याने गरिबांप्रती असलेला जातिवंत कळवळा, अशा त्यांच्या गुणविशेषांना ठळकपणे जनतेपुढे आणण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. पूर्वीपेक्षा मोदींना आज अधिक स्वीकारार्हता मिळू लागली आहे असे अरूण जेटली म्हणाले ते खरेच आहे. हे सहजासहजी घडलेले नाही. मोदींच्या अनुनासिक स्वरातील प्रदीर्घ भाषणे ऐकली तर त्यांनी त्यामध्ये हाताळलेले मुद्दे वरवरचे नसतात, तर त्यामागे एक सुनियोजित दृष्टिकोण आहे हे कळून चुकते. हिंदुत्वाचा प्रेषित म्हणून मोदींभोवती भगवे वलय निर्माण करण्यापेक्षा किंवा त्यांची ‘लार्जर देन लाइफ’ अशी प्रतिमा घडवण्यापेक्षा गोरगरिबांच्या रोजच्या प्रश्नांप्रती सच्ची कणव असलेला, गरिबीतून वर आलेला आणि रोजच्या जगण्यातले प्रश्न सोडवण्याची आस बाळगणारा नेता ही प्रतिमा मोदींना अधिक लाभदायक ठरणार आहे. त्याच दृष्टीने ही आखणी आहे आणि तीच त्यांना उत्तुंग यशाकडे घेऊन जाऊ शकते.