बंडानंतर गोवा प्रांत रा. स्व. संघ स्थापन

0
117

>> कोकण प्रांताशी संबंध तोडले; सुभाष वेलिंगकर संघचालक

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांताच्या पदाधिकार्‍यांनी गोवा विभाग संघचालक पदावरून प्रा. सुभाष वेलिंगकर यांना हटविल्याने पदाचे राजीनामे सादर केलेल्या संघ स्वयंसेवकांनी काल एकत्र येत गोवा प्रांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेची घोषणा केली. रा. स्व. संघाच्या कोकण प्रांताचा आजवर गोवा हा एक भाग होता, परंतु कोकण प्रांतापासून स्वतंत्र होत असल्याची घोषणाही काल पत्रकार परिषदेत करण्यात आली. गोवा प्रांत रा. स्व. संघाचे प्रांत संघचालक म्हणून सुभाष वेलिंगकर यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे कार्यवाह प्रवीण नेसवणकर यांनी घोषित केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजवरच्या इतिहासातील अशा प्रकारचा देशातील हा पहिला प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले.
बर्‍याच काळापासून गोवा हा रा. स्व. संघाचा वेगळा प्रांत स्थापन केला जावा असे प्रयत्न सुरू होते, परंतु कोकण प्रांताचा एक भाग म्हणूनच गोव्याला स्थान देण्यात आले होते. मात्र, विभाग संघचालक वेलिंगकर यांना पदावरून हटविण्याची घोषणा कोकण प्रांताच्या वतीने करण्यात आल्याने प्रक्षुब्ध झालेल्या गोव्यातील संघनेत्यांनी हे पाऊल उचलले आहे.
भारतीय भाषा सुरक्षा मंचाने राजकीय पर्याय स्थापन करण्याच्या दिशेने पावले टाकल्यानंतर आपल्याला विभाग संघचालक पदावरून पायउतार होण्याचा सल्ला कोकण प्रांताने दिला होता, परंतु आपण राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आपल्याला पदावरून दूर करण्यात आले असे यावेळी प्रा. वेलिंगकर यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर काल दुपारी रा. स्व. संघाच्या गोवा प्रांताची स्थापना करण्यात आली असून आपली प्रांत संघचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आता आपण प्रांत कार्यवाह म्हणून प्रवीण नेसवणकर यांची नियुक्ती करीत असल्याचे वेलिंगकर यांनी यावेळी जाहीर केले. नेसवणकर हे यापूर्वी गोवा विभाग कार्यवाह होते. आपल्याला पाठिंबा दर्शवून संघाचा राजीनामा दिलेल्या चारशे पदाधिकार्‍यांचीही पुनश्‍च नियुक्ती करण्यात येत असल्याचे वेलिंगकर यांनी जाहीर केले. गोव्यातील रा. स्व. संघाचे काम सुरूच राहणार असल्याचे वेलिंगकर यांनी स्पष्ट केले.

गोवा प्रांत रा. स्व. संघाबरोबर
जाण्याबाबत स्वयंसेवकांत संभ्रम
प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली काल स्थापन केलेल्या गोवा प्रांत रा. स्व. संघाबरोबर आपण नसल्याचे गोवा संघाचे एक ज्येष्ठ नेते प्रा. रत्नाकर लेले यांनी स्पष्ट केले असल्याची विश्‍वसनीय वृत्त आहे. दरम्यान रा. स्व. संघाचे मुख्य प्रचारक मनमोहन वैद्य यांनी येत्या दोन दिवसात कोकण प्रांत गोवा विभाग संघ कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, असे सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संघातील ताज्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर कोकण प्रांत संघ पदाधिकारी गोव्यात तळ ठोकून आहेत. प्रा. लेले यांनी आपण नव्या गोवा प्रांत संघाबरोबर नसल्याचे म्हटले असले तरी आपण भाभासुमंबरोबर असल्याचा त्यांचा दावा आहे. वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखालील संघात जाण्यासंदर्भात गोव्यातील कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असल्याचेही लेले यांचे म्हणणे आहे.

आमची निष्ठा भगव्या
ध्वजाशी ः वेलिंगकर
गोवा प्रांत रा. स्व. संघाला नागपूरच्या मुख्यालयाची मान्यता आहे का या प्रश्नावर श्री. वेलिंगकर यांनी आम्हाला त्याची आवश्यकता वाटत नसल्याचे सांगितले. आम्ही मात्र आमच्या कार्याची माहिती संघ मुख्यालयाला कळवीत राहू असे त्यांनी स्पष्ट केले. संघ स्वयंसेवक हा भगव्या ध्वजाशी बांधील असतो, सरसंघचालकांशी नव्हे असेही वेलिंगकर म्हणाले. रा. स्व. संघाचे काम हे आमच्या श्‍वासोच्छ्वासासारखे असून ते बंद पडता कामा नये यासाठी ही रचना करण्यात आल्याचे वेलिंगकर म्हणाले.