बंगळुरूचा पुण्यावर दणदणीत विजयर

0
162

पुणे
इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात गतउपविजेत्या बंगळुरू एफसीने एफसी पुणे सिटीवरील वर्चस्वाची मालिका कायम राखत ३-० असा दणदणीत विजय मिळविला. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने पूर्वार्धात दोन मिनिटांच्या अंतराने केलेले दोन गोल बहुमोल ठरले. व्हेनेझुएलाच्या मिकूने उत्तरार्धात एका गोलची भर घातली.
बंगळुरूने तीन सामन्यांत दुसरा विजय मिळविला असून त्यांनी एक बरोबरी साधली आहे. त्यांचे सात गुण झाले. बंगळुरूने पाचवरून थेट आघाडीच्या स्थानावर झेप घेतली. नॉर्थईस्टचे तीन सामन्यांतून सात गुण आहेत. नॉर्थईस्टने सात गोल करताना पाच पत्करले. त्यांचा गोलफरक दोन आहे. बंगळुरूने सहा गोल करताना दोनच पत्करले. त्यामुळे त्यांचा गोलफरक चार आहे. हा सरस गोलफरक निर्णायक ठरला.
पुणे सिटीला तीन सामन्यांत दुसरा पराभव पत्करावा लागला. एका बरोबरीसह त्यांच्या खात्यात एकमेव गुण आहे. दहा संघांमध्ये त्यांचा नववा क्रमांक आहे. पुण्याला एकच गोल करता आला आहे. त्यांचा गोलफरक उणे पाच असा झाला आहे. पुण्यासाठी मागील मोसम गाजविलेल्या एमिलियानो अल्फारो आणि मार्सेलिनियो या जोडीला फॉर्म सापडला नाही. त्यामुळे पुणेकर फुटबॉलप्रेमींची निराशा झाली, छेत्री-मिकू या प्रतिस्पर्धी जोडीच्या दर्जेदार खेळासमोर पुण्याची बचाव फळी निरुत्तर झाली.
बंगळुरूला स्थिरावण्यास वेळ लागला. छेत्रीने आधी एक चांगली संधी दवडली होती, पण त्याने लवकरच भरपाई केली. ४१व्या मिनिटाला अचूक अंदाज घेत त्याने पुण्याच्या बचाव फळीच्या मागून घोडदौड केली. त्याच्या हालचाली हेरत डिमास डेल्गाडो याने अचूक पास दिला. मग छेत्रीने पुण्याचा गोलरक्षक विशाल कैथ याला चकविले. ४३व्या मिनिटाला मिकूने बॉक्समध्ये डावीकडे छेत्रीला पास दिला. छेत्रीला रोखण्याच्या प्रयत्नात पुण्याचा सार्थक गोलुई तोल जाऊन घसरला. मग छेत्रीने ताकदवान फटका मारत कैथला चकविले. ६४व्या मिनिटाला मिकूने पुण्याच्या साहील पन्वरला दाद लागू दिली नाही. त्याने चेंडूवर ताबा मिळवित नेटच्या डाव्या कोपर्‍यात मैदानालगत जोरदार फटका मारला. कैथला झेप टाकूनही चेंडू अडविता आला नाही. पूर्वार्धात सातव्या मिनिटाला एमिलीयानो अल्फारो याने चाल रचत दिलेल्या पासवर मार्सेलिनियोलाचा फटका स्वैर होता. बंगळुरूने संथ सुरवातीनंतर चालींचा धडाका लावला. १५व्या मिनिटाला मिकूने पुण्याच्या मॅट मिल्सला चकवून चेंडूवर ताबा मिळविला. त्याने मारलेला फटका नेटवर गेला. १६व्या मिनिटाला उदांता सिंगने उजवीकडून चाल रचली, पण त्यास साथ मिळू शकली नाही.