फ्रेंच नियतकालिकावरील हल्ल्यातील एक संशयित शरण, दोघे फरारी

0
83

‘शार्ली एब्दो’ या फ्रेंच व्यंगचित्र साप्ताहिकावर सशस्त्र हल्ला चढवून संपादकासह बारा जणांची हत्या करणार्‍या तिन्ही हल्लेखोरांची ओळख पटली असून त्यातील दोघे जण भाऊ आहेत. मात्र, काल उशिरापर्यंत त्यांचा शोध लागू शकला नव्हता. त्यांचा तिसरा साथीदार पोलिसांना स्वतःहून शरण आला आहे.शार्ली एब्दो नियतकालिकावरील हल्ल्यात सामील झालेल्यांची नावे शेरीफ काऊची (३२) व सईद काऊची (३४) अशी असून एका पेट्रोल पंपचालकाने त्यांना ओळखले आहे. शेरीफ याला सन २००८ मध्ये इराकमध्ये जिहादी पाठवणार्‍यांच्या एका गटात सामील झाल्याबद्दल शिक्षाही झाली होती. दोन्ही संशयितांची माहिती फ्रान्सच्या गुप्तचर यंत्रणेला आहे. हमीद मुराद असे तिसर्‍या हल्लेखोराचे नाव आहे.
दरम्यान, काल पॅरिस शहराच्या एका भागात पोलिसावर गोळीबार करण्यात आला. त्यात एक पोलीस ठार झाला. शहराच्या अनेक भागांत तणावाचे वातावरण असून फ्रान्समध्ये काही ठिकाणी मशिदींवर हल्ले चढवण्यात आल्याचे वृत्त आहे.
पॅरिसच्या पश्चिमेच्या ली मान्स या शहरात एका मशिदीजवळ स्फोट झाला, तर आणखी एका मशिदीवर गोळीबार करण्यात आला. कालच्या हल्ल्यासंदर्भात सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
ज्या ‘चार्ली एब्दो’ नियतकालिकावर हल्ला झाला, ते साप्ताहिक पुढील बुधवारीही नेहमीप्रमाणे प्रकाशित होणार आहे.