फ्रान्सिस झेवियर शवदर्शनवर साडे अठ्ठेचाळीस कोटींचा खर्च

0
121
जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शन सोहळ्यासाठी उभारण्यात यावयाच्या साधनसुविधां तसेच सुरक्षा व्यवस्था याविषयी पत्रकार परिषदेत माहिती देताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. बाजूस वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी.

१५ नोव्हेंबरपर्यंत तयारी पूर्ण
सेंट फ्रान्सिस झेवियरच्या शव प्रदर्शन सोहळ्यासाठीची सगळी तयारी १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे या सोहळ्याच्या तयारीसाठीच्या पुनर्आढावा समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. या सोहळ्यावर अंदाजे ४८.५ कोटी रु. एवढा खर्च होणार असल्याचे ते म्हणाले.
जुने गोवे येथे चर्च परिसरात एक ते दीड हजार भाविकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येईल, तसेच तेथे सुमारे एक हजार वाहने उभी करण्याची सोयही करण्यात येणार आहे. १२० तात्पुरती शौचालये व ४ नवी कायमस्वरुपी शौचालये उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून तात्पुरते ११० सीसीटीव्ही कॅमेरे व २० कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे चर्च परिसरात बसवण्यात येणार आहेत. कचर्‍याची विल्हेवाट, आरोग्य सुविधा आदीची सोयही तेथे करण्यात येणार आहे. शव प्रदर्शनाच्या काळात तेथे ६००-६५० वाहतूक पोलीस असतील. त्याशिवाय सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी ४२० आय्‌आर्‌बी जवान, तसेच प्रशिक्षण पूर्ण करून येणार्‍या ८७ उपनिरीक्षकांबरोबरच कित्येक वरिष्ठ पोलीस अधिकारी व अन्य फौजफाटा, गृहरक्षक दलाचे ७५० जवान अशी पोलिसांची एक मोठी फौजच असेल. त्याशिवाय गरज भासल्यास केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांचीही मदत घेण्यात येणार आहे.
दरम्यान, शव प्रदर्शन सोहळ्याच्या काळात जुने गोवे चर्चसमोरून जाणार्‍या रस्त्यावरून फक्त जुने गोवेपर्यंत जाणार्‍या वाहनांनाच प्रवास करता येईल. अपवाद असेल तो फक्त दिवाडीला जाणार्‍या वाहनांचा. पणजीहून फोंडा किंवा जुने गोवेपेक्षा पुढे जाणार्‍या वाहनांना पणजी-फोंडा महामार्गावरून प्रवास करावा लागेल.चर्चपासून ३०० मीटर परिसरात असलेले सगळे बेकायदेशीर गाडे शव प्रदर्शन काळात पाडण्यात येतील. शव प्रदर्शनासंबंधीचे सर्व धोरणात्मक निर्णय (विविध परवान्यांसह) मुख्यमंत्र्याचे कार्यालय घेईल. शव प्रदर्शनासंबंधीची विविध देशांत प्रसिध्दी करण्यासाठी वेगवेगळ्या ८ विदेशी भाषांतून भित्तिपत्रे तयार करण्यात येणार आहेत. त्यात पोर्तुगीज, स्पॅनीश, इंग्लीश, जर्मन, फ्रेंच आदी भाषांचा समावेश असल्याचे पर्रीकर यानी स्पष्ट केले. दरम्यान, काही भाविकांना सांता मोनिका बोटीतूनही शव प्रदर्शन स्थळी नेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.