फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध केलेल्या अब्जाधीशांच्या यादीत पाच भारतीय महिलांनी स्थान पटकाविले आहे. त्यात जिंदाल समूहाच्या सावित्री जिंदाल, थरमॅक्सच्या अनू आगा, बायोकॉन कंपनीच्या किरण मजूमदार शॉ व हॅवेल्स इंडियाच्या विनोद गुप्ता यांचा समावेश आहे. या यादीत समाविष्ट असलेल्या महिलांना त्यांच्या पतीकडून किंवा वारसा हक्काने मिळालेली संपत्तीची नोंद घेण्यात आली आहे. या यादीत सावित्री जिंदाल आणि कुटुंबीय २८३ व्या स्थानावर आहे. त्यांची संपत्ती ५.३ अब्ज डॉलर इतकी आहे. थरमॅक्सच्या संचालक अनू आगा यांनी या यादीत पुन्हा स्थान मिळविले असून त्या १.५ अब्ज डॉलर इतक्या संपत्तीसह १३१२ व्या क्रमांकावर आहेत. जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील बायोकॉन कंपनीच्या संस्थापक-संचालक किरण मजूमदार शॉ १७४१ व्या स्थानावर आहे. त्यांची संपत्ती १ अब्ज डॉलर आहे.
फोर्ब्जच्या यादीत एकूण १८२६ जणांचा समावेश असून त्यांपैकी १९७ महिला आहेत. आकडेवारीनुसार महिलांचे प्रमाण केवळ ११% आहे. महिलांमध्ये वॉलमार्ट रिटेल चेनच्या ख्रिस्ती वॉल्टन या सर्वाधिक श्रीमंत महिला ठरल्या आहेत. त्यांची संपत्ती ४१.७ अब्ज डॉलर आहे.