आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोंडा मतदारसंघ भाजपने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासाठी (मगो) सोडावा, अशी मागणी आता मगो पक्षामध्ये जोर धरू लागली आहे. मगोचे वरिष्ठ नेते मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना फोंडा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी जनतेकडून वाढत असल्याचे सांगितले.
फोंडा मतदारसंघात सध्या विविध स्तरांवर सर्वेक्षण सुरू असून आतापर्यंत पाच वेळा सर्वे करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या सर्वेक्षणातून मतदारसंघातील जनमत व राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनीही फोंडा मतदारसंघावर पक्षाचा दावा मजबूत असल्याचे म्हटले आहे. फोंडा परिसरात मगो पक्षाचा पारंपरिक प्रभाव कायम असून, हा मतदारसंघ मगो पक्षालाच मिळायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप व मगो युतीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर फोंडा मतदारसंघाचा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होण्याची शक्यता असून फोंडा मतदारसंघाबाबतचा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.