फोंडा नगरपालिकेसाठी पुन्हा भाजप व मगोपची युती

0
141

फोंडा पालिका क्षेत्राच्या विकासाचे ध्येय नजरेसमोर ठेवून भाजप व मगोची पुन्हा युती करून नगराध्यक्षपदी प्रदीप नाईक (मगो) व उपनराध्यक्षपदी विश्वनाथ दळवी (भाजप) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अधिकार्‍यांतर्फे करण्यात येणार असून नवीन पालिका मंडळ सर्वानाच विश्वासात घेऊन विकास कामे करणार असल्याची माहिती बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप खासदार विनय तेंडुलकर, केतन भाटीकर, प्रदीप नाईक, विश्‍वनाथ दळवी, अनिल नाईक, शांताराम कोलवेकर व अन्य नगरसेवक उपस्थित होते.

मार्केटात सोपो कर प्रश्‍नावर आवश्यक तोडगा काढण्यात येणार आहे. तसेच सुरु असलेले मलनिःसारण प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येईल. फोंड्यात आवश्यक असलेला वाहतूक व्यवस्थापन नियोजनाची गरज असून सर्वांना विश्‍वासात घेऊनच काम हाती घेण्यात येणार असल्याचे बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
मागच्या पालिका मंडळात झालेल्या चुका यावेळी घडणार नाही याची दक्षता भाजप व मगो घेणार आहे, असे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

फोंडा पालिकेत मंडळ स्थापन करण्यासाठी मगोसोबत युती केल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी व काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजप नेत्यांनी नागरध्यक्षपदाची मागणी करण्याची गरज होती असा सूर काही भाजप कार्यकर्त्यांकडून फोंड्यात व्यक्त होत आहे.